वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन तसेच मेक्सिको आणि कॅनडा या दोन देशांवर भरमसाट आयातकर लावण्याची घोषणा शनिवारी केली. याला प्रत्युत्तर देत कॅनडा आणि मॅक्सिकोनेही अमेरिकन मालावर करवाढ करण्याची घोषणा केल्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यापारयुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे. चीनने ट्रम्प यांच्या घोषणेवर अद्याप प्रतिक्रिया दिली नसली, तरी जगातील दोन सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांमधील बेबनाव जागतिक अर्थकारणावर परिणाम करणारा ठरू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकन नागरिकांचे रक्षण करण्यासाठी वाढीव आयातकर आवश्यक असल्याचे ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर जाहीर केले. उद्या, मंगळवारपासून तीन देशांमधील आयात वस्तू आणि सेवांवर वाढीव कर लावण्याची घोषणा त्यांनी केली. याबाबत काढण्यात आलेल्या आदेशानुसार चिनी मालावर १० टक्के आणि मेक्सिको-कॅनडातील आयातीवर तब्बल २५ टक्के कर लावण्यात येणार आहे. कॅनडातून येणारे तेल, नैसर्गिक वायू आणि विजेचा अपवाद करत त्यावर १० टक्के आयातकर असेल. ट्रम्प यांनी काढलेल्या या आदेशावर कॅनडा आणि मेक्सिकोने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. ‘व्हाइट हाऊस’ने घेतलेला हा निर्णय आम्हाला जवळ आणण्याऐवजी दूर ढकलणारा आहे, अशा शब्दांत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खंत व्यक्त केली. त्याच वेळी अमेरिकेतून येणाऱ्या मालावर २५ टक्के कर लावण्याची घोषणाही त्यांनी केली. तर मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लॉडिया शिनबाऊम यांनीदेखील अमेरिकेन वस्तूंवर अधिक कर लावणार असल्याचे जाहीर केले.

ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात चीनशी व्यापारयुद्ध छेडले होते. आता पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत त्यांनी पुन्हा तोच कित्ता गिरवला असल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याची भीती आहे. यामुळे अमेरिकेत महागाई भडकण्याची भीती असून त्याला केवळ ट्रम्प जबाबदार असतील, असे डेमोक्रेटिक पक्षाचे सिनेट सदस्य चक शुमर यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर लिहिले आहे.

तूर्तास भारताची सुटका

ट्रम्प यांनी ‘ब्रिक्स’ देशांवर वाढीव करबोजा लादण्याचा इशारा दिला असला, तरी त्यांच्या पहिल्या करलाटेमधून भारताला वगळण्यात आले आहे. यामागे तीन प्रमुख कारणे असल्याचे मानले जाते.

१. याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा दौरा करणार असून यावेळी व्यापारी संबंधांवर वाटाघाटी होण्याची शक्यता आहे. २. भारताबरोबर असलेली अमेरिकेची व्यापारी तूट तीन देशांच्या तुलनेत कितीतरी कमी आहे. चीन, मेक्सिको आणि कॅनडाची व्यापारी तूट अनुक्रमे ३० टक्के, १९ टक्के आणि १४.५ टक्के असताना भारताबरोबरची अमेरिकेची व्यापारी तूट मात्र केवळ ३.२ टक्के आहे.

३. शनिवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महागड्या मोटारी, दुचाकींसह अमेरिकेतून आयातीवरील शुल्क कमी करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी या तीन देशांवर वाढीव कर आवश्यक आहे. त्यांनी फेंटानाईलचे (अमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन) आपल्या देशांतील उत्पादन आणि निर्यातीवर नियंत्रण आणावे. कॅनडा आणि मेक्सिकोने अमेरिकेतील घुसखोरी थांबवावी.

डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर उभे राहिलो आहोत. कॅनडाचे सैनिक अफगाणिस्तानात अमेरिकेच्या सैन्याबरोबर लढले आहेत. कॅलिफोर्नियातील वणवा, कॅटरिना चक्रीवादळात आम्ही अमेरिकेला मदत केली आहे. आपला विश्वासघात झाल्याची कॅनडाच्या जनतेची भावना आहे.

जस्टिन ट्रुडो, पंतप्रधान, कॅनडा

गुन्हेगारी टोळ्यांशी आमच्या सरकारचे लागेबांधे आहेत, हा अमेरिकेचा आरोप मी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावते. आमची अमेरिकेच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ असल्याचा आरोपही चुकीचा आहे. मेक्सिकोचे हित जपण्यासाठी जशास तसे कर लावण्याचे आदेश मी अर्थमंत्र्यांना दिले आहेत.

क्लॉडिया शिनबाऊम, अध्यक्षा, मेक्सिको