उत्तर कोरियाने अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केल्याचे जाहीर केल्यानंतर काही तासातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन बरोबरची १२ जूनला सिंगापूरमध्ये होणारी नियोजित बैठक रद्द केली आहे. ट्रम्प यांनी अचानक घेतलेली माघार हा एक मोठा झटका आहे. जागतिक शांततेच्या दृष्टीकोनातून ही बैठक होणे महत्वाचे होते.
मला तुम्हाला भेटण्याची भरपूर इच्छा होती. पण अलीकडची तुमची विधाने बघितली तर त्यामध्ये संताप आणि वैरभावना दिसते. त्यामुळे तुम्हाला भेटण्यासाठी ही वेळ मला अयोग्य वाटते असे व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
उत्तर कोरियाने गुरुवारी त्यांचा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केला. कोणाच्याही मनात संशय राहू नये यासाठी खास परदेशी पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते. गुरुवारी पत्रकारांच्या उपस्थितीत स्फोट घडवून उत्तर कोरियाने त्यांचा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केला. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन पुढच्या महिन्यात सिंगापूरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार होते. त्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आलेले हे महत्वाचे पाऊल होते.
उत्तरपूर्वेला डोंगररांगांमध्ये उत्तर कोरियाचा हा चाचणी तळ होता. उत्तर कोरियाच्या अणवस्त्र चाचण्या संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय होत्या. मागच्या काही वर्षात उत्तर कोरियाने सातत्याने अणवस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्याने जागतिक तणाव निर्माण झाला होता.