अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बदलाचे वारे जोरात वाहत असून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली सत्ता गमावणार अशी चिन्ह असून जो बायडन हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होण्याच्या वाटेवर आहेत. मात्र अमेरिकेत सुरु असलेल्या या निवडणुकांचा परिणाम थेट सातासमुद्रापार बिहारच्या निवडणुकांवरही होताना दिसतो आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यातील प्रचारसभेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी करोनाला रोखण्यात ट्रम्प अयशस्वी ठरल्यामुळे त्यांचा पराभव होत असल्याचा दावा केला.

बिहारमधील दरभंगा येथील प्रचारसभेत बोलत असताना नड्डा यांनी अमेरिकेतील निवडणुकांचा संदर्भ दिला. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात ट्रम्प अयशस्वी ठरल्यामुळे त्यांचा पराभव होत आहे. परंतू १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला पंतप्रधान मोदी यांनी योग्यवेळी लॉकडाउनचा निर्णय घेत लोकांचे प्राण वाचवल्याचं नड्डा म्हणाले.

जगातील इतर देशांप्रमाणे भारतालाही करोनाचा फटका बसला. परंतू काही कालावधीने वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यात स्थानिक सरकारी यंत्रणांना यश येत आहे. भारतात करोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसला तरीही करोनाच्या चाचण्या, उपचार, पीपीई किट्स अशा अनेक बाबतीत भारत सरकार आश्वासक कामगिरी करत आहे.

Story img Loader