काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसंदर्भात केलेल्या एका ट्विटनंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका केली आहे. ‘त्वरा करा मोदीजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा गळाभेट घ्या’ या आशयाचा उपाहासात्मक ट्विट राहुल गांधी यांनी केला आहे.
दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानचा अमेरिकेकडून कायम निषेध होतो आहे. मात्र रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘पाकिस्तान आणि तिथल्या नेत्यांसोबत चांगल्या संबंधांना आम्ही सुरूवात केली आहे. अनेक आघाड्यांवर ते सहकार्य करत आहेत यासाठी त्यांचे आभार’ या आशयाचे ट्विट केले. ज्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपहासात्मक टीका केली आहे.
Modi ji quick; looks like President Trump needs another hug pic.twitter.com/B4001yw5rg
— Office of RG (@OfficeOfRG) October 15, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली तेव्हा ‘भारत आमचा चांगला मित्र आहे’, असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. तसेच पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणावर अमेरिकेने टीकाही केली. तसेच पाकिस्तानचे कानही टोचले. पाकिस्तान येथील सुरक्षा दलाने हक्कानी नेटवर्कच्या तावडीतून एका अमेरिकन कुटुंबाची सुटका केली त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले. मात्र या ट्विटचा आधार घेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
Modi ji quick; looks like President Trump needs another hug pic.twitter.com/B4001yw5rg
— Office of RG (@OfficeOfRG) October 15, 2017
पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांसाठी त्यांचे घरच आहे अशा आशयाचे ट्विट याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. तर भारत हा आपला सच्चा मित्र असून पाकिस्तानने या देशातील दहशतवादी कारवायांना लगाम घालावा आणि काश्मीर प्रश्न चर्चेने सोडवावा असेही सल्ले अमेरिकेतर्फे देण्यात आले होते. आता मात्र पाकिस्तानने अमेरिकन कुटुंबाला सोडवल्यावर ट्रम्प यांनी चांगले संबंध प्रस्थापित करण्याबाबत ट्विट करताच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि तुम्ही ‘ट्रम्प यांना पुन्हा एकदा आलिंगन द्या’ असा खोचक सल्लाही दिला.