एपी, वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल असे पुतिन यांचे अधिकृत कार्यालय असलेल्या क्रेमलिनकडून सांगण्यात आले.

ट्रम्प यांनी रविवारी संध्याकाळी फ्लोरिडाहून वॉशिंग्टनला जाताना पत्रकारांना सांगितले की, ‘‘आम्हाला मंगळवारी काहीतरी घोषणा करायला मिळू शकते. मी अध्यक्ष पुतिन यांच्याशी मंगळवारी बोलणार आहे. त्यापूर्वी शनिवारी व रविवारी आम्ही भरपूर काम केले आहे. युद्ध थांबवता येते का यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’’ तर, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दोन्ही नेत्यांच्या चर्चा होणार असल्याच्या वृत्ताला सोमवारी सकाळी दुजोरा दिला. मात्र, हे संभाषण कशाबद्दल असेल याबद्दल अधिक काही सांगायला त्यांनी नकार दिला. ‘‘आम्ही प्रत्यक्ष चर्चेच्या आधी त्याबद्दल काही सांगणार नाही,’’ असे ते म्हणाले. ‘‘दोन्ही अध्यक्षांदरम्यानची चर्चा पूर्वी घडलेल्या चर्चेच्या आधारावरच असेल असे नाही,’’ असे सांगून त्यांनी संदिग्धता कायम राखली.

युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका व युक्रेनदरम्यान युद्धविरामाचा करार झाला असून त्यानुसार ३० दिवस युद्ध थांबवले जाईल आणि त्यानंतर या कराराचा कायमस्वरूपी विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. अमेरिकने कराराचा प्रस्ताव रशियासमोर मांडला असून पुतिन त्यांनी त्यातील काही अटींवर आक्षेप असल्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.

Story img Loader