Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल हा दिवस अमेरिकेचा ‘मुक्ती दिन’ म्हणून घोषित केला होता. यासोबतच त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ घडवून आणली. बुधवारी ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर अतिरिक्त व्यापार कर लादण्याची घोषणा केली होती.

यावेळी चीनबाबत कडक भूमिका घेत ट्रम्प यांनी चिनी उत्पादनांवर अतिरिक्त ३४% कर लादण्याची घोषणा केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून शुक्रवारी चीननेही अमेरिकन उत्पादनांवर ३४% कर लादण्याची घोषणा केली. यावर आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रम्प म्हणाले आहेत की, चीन घाबरला असून, भीतीने ते खूप चुकीची पावले उचलत आहेत.

चीनने चूक केली

चीनने शुक्रवारी अमेरिकेतून आयात होणाऱ्या उत्पादनांवर ३४ टक्के कर लावण्याची घोषणा केली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर संताप व्यक्त केला आहे. ट्रुथ सोशल सोशल मीडिया प्लटफॉर्म पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले की, “त्यांनी चूक केली आहे. ते आता घाबरले आहे. ते असे करू शकत नाहीत. त्यांना हे परवडणार नाही.”

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिलेली पोस्ट बोल्ड अक्षरांमध्ये आहे. याद्वारे ते कदाचित चीनला कडक इशारा देण्याचा प्रयत्न करत आहे.

चीनकडून जशास तसे उत्तर

दरम्यान बुधवारी अमेरिकेने चीनवर अतिरिक्त व्यापार कर लागू केल्यानंतर, आज चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर ३४% अतिरिक्त व्यापार कर लावण्याची घोषणा केली आहे. दरम्यान अमेरिकन आयातीवर हा व्यापार कर १० एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे.

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी सात दुर्मिळ पृथ्वी घटकांवर निर्यात नियंत्रणे लादली आहेत, ज्यात गॅडोलिनियम जे सामान्यतः एमआरआयमध्ये आणि यट्रियम, जे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरले जाते, यांचा समावेश आहे. पुढे, मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “त्यांनी जागतिक आरोग संघटनेच्या विवाद निवारण यंत्रणेअंतर्गत दावा दाखल केला आहे.”

याशिवाय, चीनने ११ अमेरिकन संरक्षण कंपन्यांनाचा अविश्वसनीय युनिट यादीत समावेश केला असून, १६ अमेरिकन कंपन्यांवर निर्यात नियंत्रणे लादण्याच्या तयारीत आहे. जानेवारीमध्ये ट्रम्प यांची पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढला आहे.

अमेरिका आणि जगभरातील अनेक देशांचे व्यापार करावरून वाद सुरू आहेत. २ एप्रिल रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि भारतासह अनेक देशांविरुद्ध वाढीव व्यापार कर आकारण्याचा निर्णय जाहीर केला होता.