एपी, सॅनफ्रान्सिस्को : अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांच्या पतीवर त्यांच्या निवासस्थानी घुसून हल्ला करणाऱ्या डेव्हिड डेपापे याने २०२० च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालांबाबत समाजमाध्यमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्याने ट्रम्प यांचे समर्थनही केले आहे. डेपापे हा ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील पॉवेल रिव्हर या शहराचा मूळ रहिवासी आहे. तो २० वर्षांपूर्वी सॅनफ्रान्सिस्को येथे स्थायिक झाला होता. हल्ल्याच्या या घटनेमुळे अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहांच्या सदस्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
नॅन्सी पलोसी यांचे पती पॉल पलोसी यांच्यावर शुक्रवारी सकाळी डेपापे याने हल्ला केला होता. त्यांच्या सॅनफ्रान्सिस्को येथील निवासस्थानात घुसून त्याने पॉल यांच्यावर हल्ला चढवला. वस्तुत: तो नॅन्सी पलोसी यांना शोधत होता. या वेळी ‘नॅन्सी कुठे आहे?’ असे तो सारखे ओरडून विचारत होता. ४२ वर्षीय डेव्हिड डेपापे या हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे.
त्याने ८२ वर्षीय पॉल पलोसी यांच्यावर हातोडय़ाने हल्ला केला होता. या हल्ल्यात ते जखमी झाले. अमेरिकेत होत असलेल्या मध्यावधी निवडणुकांच्या ११ दिवस आधी झालेल्या या हल्ल्यामुळे देशातील आधीच तणावग्रस्त असलेले राजकीय वातावरण आणखी गढूळ झाले आहे. या घटनेमुळे ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेच्या प्रतिनिधिगृह संकुलावर (कॅपिटॉल) ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हल्ल्याच्या कटू स्मृती ताज्या झाल्या. त्या वेळी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांचा विजय अमान्य करत ट्रम्प यांच्या हल्लेखोर समर्थकांनी या हल्ल्यादरम्यान अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.
सॅनफ्रान्सिस्कोचे पोलीस प्रमुख विल्यम स्कॉट यांनी सांगितले, की ही अजाणतेपणी झालेली घटना नसून जाणूनबुजून केलेले अत्यंत चुकीचे कृत्य आहे. पॉल पलोसींच्या उजव्या हाताला गंभीर जखम झाली असून, दोन्ही हातांना जखमा झाल्या आहेत. त्यांच्या कवटीचे हाड भंगल्याने शल्यचिकित्सा करण्यात आली आहे. ‘कॅपिटॉल’ पोलिसांनी प्रतिनिधिगृह सदस्यांना गेल्या वर्षी मिळालेल्या दहा हजार धमक्यांचा तपास केला. चार वर्षांपूर्वी सदस्यांना आलेल्या धमक्यांच्या दुप्पट धमक्या सध्या आल्या आहेत. प्रतिनिधी सभागृहातील रिपब्लिकन पक्ष सदस्य रोड्ने डेविस यांनी सांगितले, की हा पलोसी यांच्या कुटुंबीयावर नव्हे तर आम्हा सर्वावर हल्ला आहे.