Donald Trump To Buy Tesla Car: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (मंगळवारी) जाहीर केले की, ते बुधवारी सकाळी एक नवीन टेस्ला कार खरेदी करणार आहे. त्यांनी अब्जाधीश एलॉन मस्क यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी टेस्ला कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अमेरिकेतील काही गटांकडून इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “रिपब्लिकन, कंझर्व्हेटिव्ह आणि सर्व महान अमेरिकन लोकांसाठी आणि आपल्या देशाला मदत करण्यासाठी एलॉन मस्क सर्व काही पणाला लावत आहेत आणि ते एक उत्तम काम करत आहेत!”

त्यांनी पुढे लिहिले, “….पण कट्टरपंथी डाव्या विचारसरणीचे वेडे, बेकायदेशीरपणे आणि संगनमताने जगातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या टेस्लावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून एलॉन यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक गोष्टीची हानी होईल.”

“काहीही झाले तरी, खऱ्या महान अमेरिकन एलॉन मस्कवर यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मी उद्या सकाळी एक नवीन टेस्ला कार खरेदी करणार आहे”, असेही ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी लिहिले की, “अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी त्यांच्या (एलॉन मस्क) प्रचंड कौशल्याचा वापर केल्याबद्दल त्यांना शिक्षा का दिली जात आहे का?”

मस्क आणि टेस्लाला का होत आहे विरोध?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील एलॉन मस्क यांच्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) ने केंद्रीय नोकऱ्या आणि बजेटमध्ये कपात केली आहे, ज्यामुळे लोक एलॉन मस्क आणि टेस्लाचा निषेध करत आहे. सध्या अमेरिकेत होत असलेली मस्क यांच्या विरोधातील ही निदर्शने शांततेत झाली असली तरी, मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याचे वृत्तही समोर आले आहे.

मस्क आणि टेस्ला विरोधातील या निदर्शनांमुळे टेस्लाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. ट्रम्प प्रशासनात मस्क यांच्या वादग्रस्त भूमिकेवरून वाढलेली स्पर्धा आणि टीकेमुळे कंपनीच्या विक्रीत पहिल्यांदाच घट झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, टेस्लाने इतिहासात प्रथमच वार्षिक विक्रीत घट नोंदवली आहे आणि या तिमाहीत विक्री पुन्हा कमी होण्याची चिन्हे आहेत.

Live Updates

Story img Loader