वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शांतता प्रस्थापित करण्यासाठी झटपट हालचाली करा, अन्यथा तुम्ही तुमचा देश गमावून बसाल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना बुधवारी दिला. त्यापूर्वी, रशियाला युक्रेनमधील संघर्ष थांबवायची इच्छा असल्याचे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. त्यावर ट्रम्प हे रशियाने दिलेल्या खोट्या माहितीच्या जगात वावरत असल्याची प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी व्यक्त केली. त्यानंतर झेलेन्स्की हे हुकूमशहा आहेत अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

फेब्रुवारी २०२२मध्ये रशियाने केलेल्या आक्रमणाला युक्रेनच जबाबदार असल्याचा सूचक आरोप ट्रम्प यांनी मंगळवारी केला. ‘‘युक्रेनने रशियाबरोबर संघर्ष सुरू करायला नको होता,’’ असे वक्तव्य त्यांनी केले. त्यानंतर बुधवारी बोलताना, रशियाला हे युद्ध थांबवण्याची इच्छा आहे. युद्धामुळे युक्रेन, रशिया, उत्तर कोरियाच्या सैनिकांचेही जीव जात आहेत असे ते म्हणाले. युक्रेन युद्ध संवेदनाहीन असून, हे युद्ध कधीच व्हायला नको होते. माझे नेतृत्व असते, तर हे युद्ध झाले नसते, असेही ते म्हणाले. युक्रेनमध्ये निवडणुका घेतल्या जाव्यात अशी सूचना त्यांनी केली. त्यावर झेलेन्स्की यांनी प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्यावर ट्रम्प त्यांना हुकूमशहा म्हणाले. झेलेन्स्की यांनी अमेरिकेला न जिंकणाऱ्या युद्धासाठी ३५० अब्ज डॉलर खर्च करायला लावले असा आरोपही ट्रम्प यांनी केला.

दरम्यान, झेलेन्स्की यांनी कीव्हमध्ये ट्रम्प यांचे युक्रेनमधील दूत कीथ केलॉग यांची भेट घेतली. ट्रम्प यांच्या सहकार्यांनी युक्रेनबद्दल अधिक सत्य जाणून घ्यावे असे ते त्यांनी सुचवले. युक्रेनमध्ये झेलेन्स्की यांची लोकप्रियता कमी झाल्याचे रशियाने अमेरिकेला सांगितल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, कीव्ह इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशियोलॉजीने फेब्रुवारीच्या सुरुवातीला घेतलेल्या जनमत चाचणीत झेलेन्स्की यांना ५७ टक्के नागरिकांचा पाठिंबा असल्याचे दिसून आले होते.

झेलेन्स्की हे निवडणुकांशिवाय हुकूमशहा आहेत. त्यांनी शांततेसाठी तातडीने हालचाली कराव्यात अन्यथा त्यांना राहायला देश उरणार नाही. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

युक्रेनमधील माझी लोकप्रियता फक्त चार टक्के असल्याची चर्चा अमेरिका आणि रशियात झाल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. म्हणजे अध्यक्ष ट्रम्प हे दुर्देवाने खोट्या माहितीच्या जगात वावरत आहेत. – वोलोदिमिर झेलेन्स्की, अध्यक्ष, युक्रेन