वृत्तसंस्था, कीव्ह
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी तासभर चर्चा केली. ट्रम्प यांनी स्वत:च समाजमाध्यमावर पोस्ट लिहून याविषयी माहिती दिली. ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात मंगळवारी झालेल्या चर्चेनंतर दुसऱ्या दिवशी ही चर्चा झाली.
ट्रम्प-पुतिन चर्चेदरम्यान ३० दिवसांच्या कालावधीत युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले थांबवण्यास रशियाने सहमती दर्शवली होती. मात्र, ३० दिवसांच्या युद्धविरामाला त्यांनी नकार दिला होता. चर्चेनंतर रशियाने बुधवारी पुन्हा युक्रेनवर जोरदार हल्ले चढवले. त्यानंतर आपण ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार असल्याचे झेलेन्स्की यांनी जाहीर केले. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी केलेल्या विनंत्या आणि त्यांच्या गरजा विचारात घेऊन त्यांच्यात सहमती घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच आमची चर्चा अगदी योग्य मार्गावर आहे असेही सांगितले. याविषयी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्ट्झ पुढील माहिती देतील असे त्यांनी जाहीर केले.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांनंतर, रशियाची कृती आणि पुतिन यांची उक्ती यामध्ये विसंगती असल्याची प्रतिक्रयिा युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी व्यक्त केली. युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले थांबवण्याचे आदेश लष्कराला देत असल्याचे पुतिन यांनी जाहीर केल्यानंतर त्यांनी आमच्यावर रात्री १५० ड्रोन हल्ले केले असा आरोपही झेलेन्स्की यांनी केला.