Trump Vs Zelenskyy: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. अशात त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठीही पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी युक्रेन-रशिया युद्धावर चर्चा करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना अमेरिकेत आमंत्रित केले होते. दरम्यान काल झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेली बैठक वादग्रस्त ठरली आहे. यामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले. यानंतर संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी, झेलेन्स्की यांनी जेव्हा ते शांततेसाठी तयार होतील तेव्हाच परत यावे, असे म्हटले आहे.

मला शांतता हवी आहे

“माझ्या लक्षात आले आहे की, जर अमेरिका सहभागी असेल तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शांततेसाठी तयार नाहीत, कारण त्यांना वाटते की आमच्या सहभागामुळे त्यांना वाटाघाटींमध्ये मोठा फायदा होतो. मला फायदा नको आहे, मला शांतता हवी आहे. त्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचा अनादर केला. जेव्हा ते शांततेसाठी तयार असतील तेव्हा त्यांनी परत यावे,” असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे.

तिसऱ्या महायुद्धावर जुगार खेळत आहात

आपल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले आहे की, “तुमच्याकडे सध्या कोणतेच पत्ते नाहीत, तुम्ही तिसऱ्या महायुद्धावर जुगार खेळत आहात. आज व्हाईट हाऊसमध्ये आमची खूप उत्तम बैठक झाली आणि माझ्या लक्षात आले आहे की, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अद्याप शांततेसाठी तयार नाहीत. त्यांनी अमेरिकेचा अनादर केला आहे.”

झेलेन्स्की काय म्हणाले?

व्हाईट हाऊसमध्ये घडलेल्या प्रकारानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले की, “जोपर्यंत त्यांना हल्ल्याविरुद्ध सुरक्षा हमी मिळत नाही तोपर्यंत त्यांचा देश रशियासोबत शांतता चर्चेत सहभागी होणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेटीदरम्यान झालेला वाद दोन्ही देशांसाठी चांगली गोष्ट नाही. ट्रम्प यांनी हे समजून घेण्याची गरज आहे की, युक्रेन रशियाबद्दलचा आपला दृष्टिकोन एका क्षणात बदलू शकत नाही.”

खरं तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची युक्रेनने कोणत्याही किंमतीत युद्ध रोखण्यासाठी तयार व्हावे अशी इच्छा होती, म्हणूनच झेलेन्स्की यांना अमेरिका दौऱ्यावर बोलावण्यात आले होते. पण झेलेन्स्की पुतिन यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडीसाठी तयार दिसत नव्हते. संभाषणादरम्यान, त्यांनी पुतिन यांना खुनी देखील म्हटले. त्यांच्या या वर्तणुकीमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प खूप संतापले.

Story img Loader