PM Narendra Modi on The Sabarmati Report: गुजरातमध्ये २००२ साली घडलेल्या गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर बेतलेला द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरून २२ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा पुन्हा एकदा ऊहापोह होत आहे. गोध्रा प्रकरणात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर बरीच टीका झाली होती. आता यावर चित्रपट आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “बनावट कथानक केवळ काही वेळेपुरतेच असते. पण अखेर सत्य समोर येतच.”
एक्स माध्यमावरील विक्रांत भट नावाच्या एका युजरने चित्रपटाबद्दल स्वतःचे विचार मांडले आहेत. या युजरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी या ट्विटला उत्तर दिले. ते म्हणाले, “बनावट कथानक केवळ मर्यादीत काळापुरतेच टिकते. त्यानंतर सत्य समोर येतेच. तुम्ही अतिशय योग्य म्हटलेले आहे. त्या घटनेतील सत्य बाहेर येत आहे, हे चांगलेच झाले. तसेच सर्वसामान्यांनाही याची माहिती होईल.”
अभिनेता विक्रांत मेस्सी प्रमुख भूमिकेत असलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा सिनेमा १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. विक्रम भट या युजरने सदर चित्रपट पाहिल्यानंतर आपले मत व्यक्त केले असून प्रत्येकाने चित्रपट पाहावा असे आवाहन केले आहे. अलीकडच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाण्या घटनेमागील खरे सत्य या चित्रपटाच्या निमित्ताने समोर आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा विषय अतिशय संवेदनशीलता आणि जबाबदारीने हाताळला आहे. या घटनेत ५९ निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. आज त्यांना योग्य श्रद्धांजली लाभली आहे.
२००२ साली गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातच्या अनेक भागात हिंसाचार उसळला होता. या घटनेवर सदर चित्रपट बेतलेला असून धीरज सरना यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे.