संयुक्त जनता दलाच्या जाहीर सभेत मंगळवारी राजगिर येथे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पक्षाध्यक्ष शरद यादव यांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून त्यांचेच सहकारी शिवानंद तिवारी यांनी थेट नरेंद्र मोदी यांचीच जाहीर स्तुती सुरू केल्याने नेत्यांना धक्का बसला तर कार्यकर्तेही संभ्रमात पडले.
आपल्याला मोदी यांच्याविरुद्ध लढायचे आहे, असे एकीकडे सांगतानाच, त्यांच्या ताकदीला कमी लेखू नका, असा सूर लावत तिवारी यांनी मोदीस्तुती सुरू केली. मोदी हे एका मागासवर्गिय कुटुंबात जन्मले. साध्या घरातच त्यांचे बालपण गेले.
रेल्वेत चहा विकून त्यांनी कुटुंबाचा आर्थिक गाडा चालवला, असा गौरव करतानाच तिवारी यांनी नितीश कुमार यांनाही फटकारले.
आपला पक्ष आणि भाजपचे आघाडी सरकार उत्तम काम करीत होते. राष्ट्रीय राजकारणासाठी संयुक्त जनता दलाने भाजपशी फारकत घेतली. भाजपने मोदी यांना पंतप्रधानपदासाठी उभे केले आहे जे साध्या घरातून पुढे आले आहेत. आज ते जेथे आहेत तेथे पोहोचण्यासाठी त्यांनी फार मोठा संघर्ष केला आहे. मी त्यांची स्तुती करतो. आपल्याला त्यांच्याशीच लढायचे आहे. पण त्यांची ताकदही आपण ओळखली पाहिजे.
तुम्हाला मोदी यांच्याबद्दल मत्सर का, असा थेट सवाल नितीश कुमार यांना करीत तिवारी म्हणाले, नितीशजी मी तुमचा जुना मित्र आहे. मित्राची प्रगती झाली तर आपल्याला आनंदच व्हायला हवा. आपल्या कुणालाही पंतप्रधान बनायचे नाही. मग जर कुणी त्या पदासाठी झळाळत असेल तर मन मोठे करून त्यांच्याबरोबर काम करण्यात कोणता धोका आहे? तिवारी यांच्या या प्रश्नानंतर सभेत काही कार्यकर्त्यांनी जोरदार गदारोळ केला.
तिवारी आणि चारा घोटाळा
चारा घोटाळ्यात शिवानंद तिवारी यांचेही नितीश कुमार यांच्या बरोबर नाव आहे. त्यांच्या चौकशीची मागणीही भाजपने केली होती. तिवारी यांना पक्षाने काही दिवसांपूर्वीच प्रवक्तेपदावरून दूर केले आहे. एकेकाळी लालूप्रसाद यांचे निकटवर्ती असलेले तिवारी हे नितीश कुमार यांच्याकडे सत्ता येताच जनता दलात आले. त्यांची राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदतही लवकरच संपत असून त्यांना पक्षातर्फे पुन्हा उमेदवारी दिली जाणार नसल्यानेच त्यांनी मंगळवारच्या सभेत मोदीस्तुती गायल्याची चर्चा आहे.