Dating and Trading Scam: घटस्फोट झाल्यानंतर प्रेमाच्या शोधात असलेल्या एका व्यक्तीला डेटिंग ॲपवर प्रोफाइल तयार करणे चांगलेच महागात पडले आहे. या कृतीमुळे या व्यक्तीला त्याच्या आयुष्यभराची कमाई गमवावी लागली. नोएडा येथे राहणाऱ्या पीडित व्यक्तीची मागच्या वर्षी एका महिलेशी ओळख झाली. या महिलेने सदर व्यक्तीला त्याचे पैसे काही कंपन्यात गुंतवण्यासाठी तयार केले. या गुंतवणुकीवर मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. या गुंतवणुकीच्या नादात पीडित व्यक्तीने एकूण ६.३ कोटी रुपये गमावले आहेत.

डेटिंग ॲपवरील फसवणूक

दिल्लीतील एका कंपनीत संचालक म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीची डिसेंबर २०२४ मध्ये अनिता नावाच्या एका महिलेशी ओळख झाली. ती हैदराबादची असल्याचे तिने सांगितले. डेटिंग ॲपवरून दोघांमधील संभाषण वाढले आणि ते हळूहळू जवळ आले. दोघांमध्ये मैत्री वाढली. पीडित व्यक्तीचा विश्वास संपादन केल्यानंतर अनिताने त्यांना तीन कंपन्यांत पैसा गुंतविण्याचा सल्ला दिला. या गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळेल, असे आमिष तिने दाखवले.

पीडित व्यक्तीने सुरूवातीला एका वेबसाईटवरून ३.२ लाखांची गुंतवणूक केली आणि त्याला अवघ्या काही तासांत २४ हजारांचा नफा मिळाला. या वेबसाईटवरून स्वतःच्या बँक खात्यात आठ हजार रुपयांचा नफा वळता केल्यानंतर त्याला सदर गुंतवणूक खात्रीशीर असल्याचा विश्वास पटला. अनिता आपली चांगली मैत्रीण असल्यामुळे तिने आपल्या भल्यासाठीच हा मार्ग दाखवला, असा पीडित व्यक्तीचा समज झाला.

त्यानंतर पीडित व्यक्तीने त्याची आयुष्यभराची सुमारे ४.५ कोटी रुपयांची बचत तीन वेबसाइटद्वारे तीन कंपन्यात गुंतवली. तसेच अनिताच्या सूचनेनुसार त्याने दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि तेही गुंतवले. २५ खात्यांमधून ३० वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण ६.५ कोटींची रक्कम गुंतविली गेली.

रक्कम परत न मिळाल्यामुळे संशय

पीडित व्यक्तीने गुंतवणूक केलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना एकूण गुंतवणुकीवरील केवळ ३० टक्के रक्कम परत काढता येईल, असे सांगण्यात आले. मात्र याचा विरोध केल्यानंतर समोरून पीडित व्यक्तीचा संपर्क तोडण्यात आला. त्यांनी गुंतवणूक केलेल्या तीन वेबसाईटपैकी दोन वेबसाईट बंद झाल्या. या व्यवहारात काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्यानंतर पीडित व्यक्तीने तात्काळ नोएडा सेक्टर – ३६ मधील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तपासाअंती अनिता नामक मुलीचे डेटिंग ॲपवरील प्रोफाइल बोगस असल्याचे निष्पन्न झाले. आता पीडित व्यक्तीने ज्या खात्यांमध्ये पैसे वळते केले, त्याची माहिती पोलीस गोळा करत आहेत.