हिंदी महासागरात २६ डिसेंबर २००४ रोजी आलेल्या सुनामीला दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त आयोजित प्रार्थना सभांमध्ये अनेकांचा अश्रूंचा बांध फुटला.
किमान दोन लाख २० हजार लोक या सुनामीत मरण पावले होते. ३५ मीटर उंचीच्या अक्राळविक्राळ लाटांनी आजूबाजूचा सगळा प्रदेशच उद्ध्वस्त केला होता. इंडोनेशियाच्या पश्चिमेला ९.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाल्याने मोठय़ा सागरी लाटांचा सामना लोकांना करावा लागला. इंडोनेशिया, भारत, थायलंड, श्रीलंका व सोमालिया यांच्यासह १४ देशांना त्याचा फटका बसला.
ख्रिसमसच्या निमित्ताने आलेले हजारो पर्यटक यात मरण पावले. ही वेगळी नैसर्गिक आपत्ती कुणी अनुभवली नव्हती. त्यामुळे सगळेच गाफील होते. आज दहाव्या स्मृतिदिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्रगीत अधिकृत स्मृतिस्थळ असलेल्या उद्यानात वाजवण्यात आले. इंडोनेशियात बंदा असेह या भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून जवळ असलेल्या शहरात हे उद्यान उभारण्यात आले आहे. तेथे ११५ फूट उंचीच्या लाटा रोरावत आल्या होत्या. शेतात हजारो प्रेतांचा खच पडला होता. इंडोनेशियाचे उपाध्यक्ष जुसूफ कल्ला यांनी सांगितले, की त्या वेळी अश्रू, गोंधळ, धक्का, दु:ख, भीती अशा अनेक भावना लोकांच्या मनात दाटल्या होत्या. आजही सगळय़ांच्याच डोळय़ांत अश्रू आहेत, पण आपण यातून उभे राहिलो आहोत. स्थानिक, परदेशी अशा अनेक दात्यांनी त्या वेळी मदत केली.आज मशिदींमध्ये नमाज पढण्यात आला. अनेक ठिकाणी लोकांनी सामुदायिक दफनभूमींना भेट दिली, तिथे किमान १ लाख ७० हजार मृतांचे दफन करण्यात आले होते. रेडक्रॉसने त्या वेळी मरण पावलेल्या लोकांची ओळखपत्रे, बँक कार्ड सादर केली व त्या स्मृती सामोऱ्या आल्या.
आम्हाला वाचवून ‘ती’ गेली..
स्वित्र्झलडचा एक नागरिक रेमंड मूर याने सांगितले, की क्षितिजावरून एक पांढरी रेषा वेगाने किनाऱ्याकडे येताना दिसत होती. मी आणि माझी पत्नी सकाळी ब्रेकफास्ट घेत होतो. मी माझ्या पत्नीला पळायला सांगितले, कारण ती लाट नव्हती तर काळी भिंतच होती. वॉशिंग मशिनमध्ये सापडल्यावर जसे होईल तशी ती स्थिती होती. एका थायलंडच्या महिलेने हॉटेलमधून मला बाल्कनीत ओढले. दुर्दैवाने ती नंतर मरण पावली. माझी पत्नीही या दुर्घटनेतून वाचली, पण आम्हाला वाचवणारी ती महिला मात्र गेली, हे सांगताना मूरला अश्रू अनावर झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा