अंदमान व निकोबार बेटांवर रंगाचांग येथे बसवण्यात आलेल्या सुनामी इशारा यंत्रणेच्या मदतीने भूकंपानंतरच्या सुनामीची सूचना अवघ्या तीन मिनिटांत मिळू शकेल, असे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी या संस्थेचे मुख्य वैज्ञानिक विनित कुमार यांनी सांगितले. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर तीन मिनिटांत सुनामी येणार की नाही याचा इशारा मिळेल, असे त्यांनी डॉलीगंज येथे झालेल्या एका बैठकीत सांगितले. भूकंप झाल्यानंतर सागरी लाटांवर त्यांचा काय परिणाम होतो याचा आढावा घेऊन लगेचच सुनामीबाबत पूर्वसूचना दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इनफॉर्मेशन सव्‍‌र्हिसेस या हैदराबाद या संस्थेशी सल्लामसलतीनंतर सुनामीच्या धोक्याचा इशारा विविध विभागांना पाठवला जाईल.

सुनामीनंतर विशिष्ट भाग पाण्याखाली जाण्याची भीती
विविध विभागांमध्ये भूकंपाचा महासागरांवर होणारा परिणाम अभ्यासल्यानंतर असे लक्षात आले, की यातील काही भाग हे सुनामीनंतर ५ ते १५ मीटर पाण्याखाली जाऊ शकतात, त्याबाबतचा अहवाल प्रशासनास पाठवला असून जोखमीच्या भागातील लोकांचे पुनर्वसन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सुनामी आल्यानंतर हे भाग पाण्याखाली जाऊ शकतात अशी स्थिती आहे, असे कुमार यांनी सांगितले.

जास्त मासे मिळावेत यासाठी १० यंत्रे
मच्छीमारांसाठी मायाबंदर, गिलगिपूर चिडियाटापू, हट बे, कार निकोबार व कॅम्पबेल बे या ठिकाणी १० यंत्रे लावण्यात आली असून प्रत्येक यंत्राची किंमत ही १० लाख रुपये आहे. त्यामुळे मच्छीमारांना जास्त प्रमाणात मासे पकडता येणार आहेत. या यंत्रातून बाहेर टाकल्या जाणाऱ्या प्रकाशाने मोठे मासे आकर्षित होतात विशेष करून टय़ुना मासे मच्छीमारांना पटकन मिळतील, मच्छीमारांना जास्त मासे मिळावेत हा त्यामागचा हेतू आहे. अंदमान निकोबार बेटांवर निक्षारीकरण प्रकल्प राबवण्याचाही सरकारचा विचार आहे.

Story img Loader