तू है क्या चीज? बाहर मिल म्हणत आरोपी आणि त्याच्या वकिलाने महिला न्यायाधीशांनाच धमकी दिल्याचा प्रकार राजधानी दिल्लीत घडला आहे. न्यायालयातच आरोपी आणि त्याच्या वकिलाने महिला न्यायाधीशाला शिवीगाळ केली. धनादेश बाऊन्स झाल्या प्रकरणी सुनावणी सुरु होती त्यावेळी हे दोघंही भडकले आणि त्यांनी थेट महिला न्यायाधीशाला तुला बघून घेतो म्हणत धमकी दिली.
नेमकी काय घडली घटना?
दिल्लीतल्या न्यायालयात चेक बाऊन्स प्रकरणी सुनावणी सुरु होती. मात्र महिला न्यायाधीशांनी आरोपीच्या बाजूने निर्णय दिला नाही. त्यानंतर या आरोपीने महिला न्यायाधीशावर वस्तू फेकण्याचाही प्रयत्न केला. तसंच वकिलाला सांगितलं मला माझ्या बाजूने निकाल हवा आहे. काय वाट्टेल ते कर आणि मला निकाल माझ्या बाजूने करुन दे. एवढ्यावरच हा आरोप थांबला नाही तर त्याने महिला न्यायाधीशाला धमकी दिली. “तू है क्या चीज? तू बाहर मिल, देखते हैं, कैसे जिंदा घर जाती है?” असं म्हणत आरोपीने आणि त्याच्या वकिलाने महिला न्यायाधीशाला धमकी दिल्याची घटना दिल्लीत घडली आहे. न्यायदंडाधिकारी शिवांगी मंगला यांनी चेक बाऊन्स प्रकरणात कलम १३८ च्या अंतर्गत आरोपीला दोषी ठरवलं होतं. तसंच पुढील सुनावणीच्या वेळी कलम ४३७ ए नुसार सीआरपीसी जामीन बॉण्ड सादर करण्याचे निर्देशही दिले होते. त्यावेळी ही घटना घडली. Bar and Bench ने हे वृत्त दिलं आहे.
विरोधात निकाल दिल्याने आरोपी संतापला
दरम्यान आपल्या विरोधात निकाल दिला गेल्याने आरोपी आणि त्याच्या वकिलाने महिला न्यायाधीशाला न्यायालयातच धमकावल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे आपल्याला मानसिक आणि शारिरीक त्रास झाल्याचं शिवांगी मंगला यांनी म्हटलं आहे. तसंच तू हे पद सोडून दे म्हणत त्यांना शिवीगाळ केली असं न्यायाधीश शिवांगी मंगला यांनी त्यांच्या आदेशात म्हटलं आहे. तू आमच्या बाजूने निकाल दिला नाहीस तर तुझ्या विरोधात तक्रार दाखल करु, तू राजीनामा दे आणि या प्रकरणातून बाजूला हो अशीही धमकी दिली गेल्याचं महिला न्यायाधीश शिवांगी मंगला यांनी म्हटलं आहे.
आरोपीच्या वकिलाला कारणे दाखवा नोटीस
धमकी दिल्याबद्दल आणि छळ केल्याबद्दल आरोपींवर राष्ट्रीय महिला आयोगासमोर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं न्यायाधीशांनी सांगितलं आहे. या प्रकरणात न्यायाधीशांनी आरोपीच्या वकिलालाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अॅडव्होकेट अतुल कुमार असं त्या वकिलाचं नाव आहे. वकिलाने आरोपीच्या सांगण्यावरुन असं वर्तन का केलं? असाही सवाल करण्यात आला आहे.