पुढच्यावर्षी २०२० साली अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुलसी गॅबर्ड या हिंदू महिलेकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान मिळू शकते. तुलसी गॅबर्ड या अमेरिकन काँग्रेसच्या कायदेमंडळाच्या सदस्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत असल्याचे तुलसी यांनी जाहीर केले आहे.
तुलसी गॅबर्ड या डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत असलेल्या दुसऱ्या उमेदवार आहेत. त्यांच्याआधी सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी सुद्धा शर्यतीत असल्याचे जाहीर केले आहे. गॅबर्ड अवघ्या ३७ वर्षांच्या आहेत. कॅलिफोर्नियातील भारतीय वंशाचे सिनेटर कमला हॅरिस यांच्यासह डेमोक्रॅटसकडून एकूण १२ जण राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी दावा करु शकतात.
हवाईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तुलसी गॅबर्ड यांनी डेमोक्रॅटसकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करणार असून पुढच्या आठवडयात याची घोषणा करीन असे शुक्रवारी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. गॅबर्ड अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणाऱ्या पहिल्या हिंदू ठरु शकतात.
गॅबर्ड या भारतीय अमेरिकन नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तर त्या अमेरिकेतील सर्वात तरुण आणि पहिल्या महिला अध्यक्ष ठरतील. अमेरिकेतील सर्वोच्च पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या बिगर ख्रिश्चन आणि पहिल्या हिंदू महिला ठरतील. सध्याच्या घडीला अमेरिकेतील राजकीय तज्ञांच्या मते तुलसी गॅबर्ड यांना फारशी संधी नाही. डोनाल्ड ट्रम्पचा २०२० मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असू शकतात. डेमोक्रॅटिक पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवाराला पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले जाईल.