Tulsi Gabbard On Donald Trump Tariffs On India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या टॅरिफच्या मुद्द्यावर भारत आणि अमेरिकेच्या उच्च नेतृत्व पातळीवर थेट चर्चा झाली आहे, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी सोमवारी सांगितले. नवी दिल्लीतील थिंक टँक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वार्षिक रायसीना डायलॉग्सच्या वेळी बोलताना तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, “भारत आणि अमेरिकेतील आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी ही एक मोठी आणि चांगली संधी आहे.”
…मला आनंद झाला
तुलसी गॅबार्ड म्हणाल्या, “गेल्या काही दिवसांत मी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी जे बोलले त्यावरून असे दिसून येते की अमेरिकेने लादलेले शुल्क भारतासाठी एक संधी बनले आहे.” त्या म्हणाल्या की, यामध्ये आपले आर्थिक संबंध मजबूत करण्याची मोठी क्षमता आहे. “येथे टॅरिफला अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे, हे पाहून मला आनंद झाला,” असे गॅबार्ड म्हणाल्या.
“पंतप्रधान मोदी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आणि भारतीय जनतेच्या हिताच्या दृष्टीने काय चांगले आहे हे पाहत आहेत. त्याचप्रमाणे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही अमेरिकेसाठी, आपल्या आर्थिक हितासाठी आणि अमेरिकन लोकांच्या हितासाठी हेच करत आहेत,” असे त्यांनी पुढे सांगितले.
ट्रम्प आणि मोदी उपाय शोधत आहेत
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक असलेल्या तुलसी गॅबार्ड यांनी स्पष्ट केले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी दोघेही टॅरिफच्या मुद्द्यावर चांगला उपाय शोधत आहेत. “मला एक मोठी सकारात्मक बाब वाटते, ती म्हणजे आपल्याकडे दोन नेते आहेत ज्यांच्याकडे कॉमन सेन्स आहे आणि ते चांगले उपाय शोधत आहेत. याबाबतची चर्चा थेट दोन्ही देशांच्या अगदी वरच्या पातळीवर होत आहे,” असेही गॅबार्ड म्हणाल्या.
महाभारतावरही भाष्य
तुलसी गॅबार्ड मुलाखतीच्या शेवटी म्हणाल्या की, “दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चांगली मैत्री आहे आणि याच आधारावर दोन्ही देश त्यांची भागीदारी पुढे नेतील.” दरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, तुलसी गॅबार्ड यांनी महाभारतातील शिकवणींबद्दल, विशेषतः कृष्णाने अर्जुनाला दिलेल्या शिकवणींबद्दल आणि गीतेबद्दलही भाष्य केले.
भारत आणि अमेरिकेबद्दल बोलताना तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, “आम्हाला आमचे संबंध मजबूत करायचे आहेत, ही ताकद केवळ बुद्धिमत्ता क्षेत्राशी संबंधित नाही तर वाणिज्य, व्यापार, संरक्षण आणि शिक्षणाशी देखील संबंधित आहे.”
गॅबार्ड-राजनाथ सिंह भेट
दरम्यान तुलसी गॅबार्ड यांनी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेतील संरक्षण आणि सुरक्षा संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली. भारताने अमेरिकन मद्यावर जास्त कर लादल्याबद्दल अमेरिकेने काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती.