‘ट्विटर’ या सामाजिक माध्यम संकेतस्थळावर सरकारने सलग पाच दिवस घातलेली बंदी अयोग्य असून ती मागे घेण्यात यावी, असे आदेश येथील न्यायालयाने दिले. त्यामुळे, अखेर ट्विटरवरील बंदी उठली आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत्यक्ष प्रत उपलब्ध झाल्यानंतर तुर्कस्तानच्या दूरसंचार मंत्रालयाने या संकेतस्थळावरील बंदी मागे घेण्यात आल्याचे आदेश जारी केले, अशी माहिती उपपंतप्रधान ब्युलेंत अॅरिन्क यांनी दिली. पंतप्रधान रेसेप ताय्यिप यांनी ‘सरकारमधील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकणारी ध्वनिचित्रमुद्रणे सामाजिक माध्यमांवर कोठून आली त्याची पाळेमुळे खणून काढा,’ असे आदेश दिल्यानंतर ट्विटर या संकेतस्थळावर देशात बंदी घालण्यात आली होती. मात्र, अध्यक्ष अब्दुल्ला गुल यांनी या निर्णयास आपला विरोध नोंदवला होता.
तुर्कस्तानी न्यायालयाने आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचा निर्णय दिला असतानाही त्याचे पालन न झाल्याची टीका करीत तेथील दूरसंचार मंत्रालयाने हा बंदी आदेश जारी केला होता. मात्र या निर्णयावर जगभरातून टीका झाली. तसेच देशातील नागरिकांनीही या निर्णयावर आपली जाहीर नाराजी प्रकट केली. विधिज्ञ, वकील, पत्रकार आणि विरोधी पक्षाने ही बंदी अन्याय्य आणि घटनाबाह्य़ असल्याचे सांगत ती उठविण्यात यावी, अशी विनंती न्यायालयास केली होती. त्याला अनुसरून न्यायालयाने हा निर्णय दिला.
तुर्कस्तानात ट्विटरवरील बंदी मागे
‘ट्विटर’ या सामाजिक माध्यम संकेतस्थळावर सरकारने सलग पाच दिवस घातलेली बंदी अयोग्य असून ती मागे घेण्यात यावी, असे आदेश येथील न्यायालयाने दिले.

First published on: 27-03-2014 at 06:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkestan takes off ban over twitter