तुर्कस्तानची राजधानी अंकारामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू तर १४ जण जखमी झाले आहेत. यावेळी दहशतवाद्यांनी तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या मुख्यालयाला लक्ष्य केलं आहे. या ठिकाणी बॉम्बस्फोट तसेच गोळीबारही करण्यात आला आहे. तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी स्थानिक माध्यमांना या हल्ल्यासंदर्भात माहिती दिली.

अली येरलिकाया यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दोन दहशतवाद्यांनी तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या मुख्यालयाबाहेर बेछुट गोळीबार केला. तसेच याठिकाणी बॉम्बस्फोटही झाला. या स्फोटात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात जवळपास १४ जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा – विश्लेषण: तुर्कस्तानमध्ये एर्दोगन यांच्या फेरनिवडीचा परिणाम काय? युरोप, अमेरिकेसह रशियासोबत संबंधांवर फरक पडेल?

या हल्ल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण या हल्ल्यामागे पीकेके या कुर्दिश बंडखोरांचा गट असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या हल्ल्यानंतर तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी एक्स या समाज माध्यमावरही प्रतिक्रिया दिली. तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला आहे. दुर्दैवाने यात आपले काही जवान शहीद झाले आहेत. तर अनेक लोकं जखमी झाले आहेत, असे ते म्हणाले. तसेच अंकाराचे महापौर मन्सूर यावस यांनीही या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली. “आम्ही दहशतवादी हल्ल्याच निषेध करतो. या हल्ल्यात जे जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच जे जखमी आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावले यासाठी प्रार्थना करतो” असे ते म्हणाले.

हेही वाचा – तुर्कस्तानात धर्मवादी राजकारणाला शहरी मतदारांनी नाकारले? अध्यक्ष एर्दोगान यांच्या पक्षाला स्थानिक निवडणुकांत अपयश कशामुळे?

नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांनीही या हल्ल्यानंतर निषेध व्यक्त केला. तुर्कीवर झालेला हल्ला गंभीर आहे. आम्ही तुर्कीबरोबर आहोत. या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. या घटनेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे ते म्हणाले.