टर्की आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपाने आतापर्यंत २१ हजारांहून लोकांचा बळी घेतला आहे. भूकंप आल्यापासून लोकांचं हृदय पिळवटून टाकणाऱ्या अनेक घटना, छायाचित्र आणि व्हिडीओ आपण पाहिले आहेत. परंतु यादरम्यान काही दिलासा देणारे क्षण देखील पाहायला मिळाले आहेत. असाच एक क्षण भारताच्याही वाट्याला आला. टर्कीत भूकंप आल्यानंतर तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती. अशावेळी भारतासह अनेक देशांनी टर्कीत बचाव पथकं पाठवली. भारताने एनडीआरएफच्या तीन टुकड्या आणि एक वैद्यकीय पथक टर्कीला रवाना केलं. भारताच्या एनडीआरएफचं एक पथख ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी देवदूत ठरतंय.
भारताने टर्कीत बचावकार्य सुरू केलं आहे. भारताने या मोहीमेला ‘ऑपरेशन दोस्त’ असं नाव दिलं आहे. या बचाव मोहीमेदरम्यान भारताच्या एनडीआरएफच्या जवानांनी ६ वर्षांच्या एका मुलीचा जीव वाचवला. ही चिमुरडी अनेक तास इमारतीच्या मलब्याखाली अडकली होती. भारताच्या जवानांची ही कामगिरी पाहून तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल.
NDRF च्या पथकाने ६ वर्षांच्या मुलीला वाचवलं
एनडीआरएफने टर्कीत चालवलेल्या ‘ऑपरेशन दोस्त’ मोहीमेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एनडीआरएफच्या एका पथकाने इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ वर्षांच्या मुलीला वाचवल्याचं पाहायला मिळत आहे. या मुलीचं नाव बेरेन असं आहे.
हे ही वाचा >> टर्की-सीरियातल्या भूकंपामुळे २१ हजारांहून अधिक बळी, मलब्याखाली अजूनही शेकडो लोक अडकल्याची शक्यता
अमित शाह यांच्याकडून शाबासकी
गृहमंत्री अमित शाह यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी ट्विट करत एनडीआरएफचं कौतुक केलं आहे. शाह यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “आम्हाला एनडीआरएफचा अभिमान वाटतो. टर्कीमध्ये सुरू असलेल्या बचाव मोहीमेदरम्यान भारतीय जवानांनी गाझियांटेप शहरात ६ वर्षांची मुलगी बेरेन हिला वाचवलं. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात आम्ही एनडीआरएफला जगातील सर्वात अग्रगण्य आपत्ती निवारण दल बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”