तुर्कस्तान सोमवारी आणि मंगळवारी ३० तासांमध्ये झालेल्या ५ भूकंपांनी हादरला आहे. या भूकंपांमुळे आतापर्यंत ७,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. देशात शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भूकंपग्रस्त भागात तुर्कस्तानसह अनेक देशांकडून बचाव मोहिमा सुरू आहेत. परंतु आता देशासमोर आणखी एक संकट उभं ठाकलं आहे. खराब हवामान आणि कडाक्याच्या थंडीमुळे बचाव मोहिमा राबवणं खूप कठीण झालं आहे.
तीन दिवसांपासून भूकंपग्रस्त भागात बचाव मोहिमा सुरू आहेत. इमारती कोसळल्यानंतर इमारतींच्या मलब्याखाली हजारो लोक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. हजारो लोक या भूकंपात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णलयांमध्ये उपचार सुरू आहेत. १९९९ नंतर पहिल्यांदाच तुर्कस्तानात इतका मोठा भूकंप आला आहे. या भूकंपाची तीव्रता ७.८ मॅग्निट्युड इतकी होती. या भूकंपाने आतापर्यंत ७,२०० नागरिकांचा बळी घेतला आहे. मृतांमध्ये हजारो लहान मुलं आहेत. भूकंपांनंतर देखील अनेक भागांमध्ये हादरे जाणवले आहेत.
कडाक्याच्या थंडीने अडचणी वाढवल्या
तुर्कस्तानात थंडी खूप वाढली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे बचाव मोहिमा राबवणं अवघड झालं आहे. एकीकडे हजारो लोकांची घरं भूकंपामुळे जमीनदोस्त झाली आहेत, त्यामुळे हजारो कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. अशातच कडाक्याच्या थंडीमुळे लोकांसमोरच्या चिंता वाढल्या आहेत. कडाक्याच्या थंडीत उघड्यावर राहणं आणि जगणं अवघड आहे.
हे ही वाचा >> विश्लेषण: ३३ हजार लोकांचा बळी घेणारा टर्कीमधला ‘तो’ भूकंप; तुर्कस्थानातली सर्वात भयंकर नैसर्गिक आपत्ती!
वीज गेली, तेलाचा तुटवडा
अनेक भूकंपग्रस्त ठिकाणं अशी आहेत जिथं वीज आणि तेल उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी बचाव पथकं रात्र-दिवस बचावकार्य करत आहेत. तसेच नागरिकही मदतीसाठी बाहेर पडू लागले आहेत. त्यांचे मित्र, नातेवाईक आणि शेजाऱ्यांना शोधू लागले आहेत. राष्ट्रपती तईप एर्दोगन म्हणाले की, खराब हवामान हे बचाव मोहिमांसमोरचं मोठं संकट आहे. कडाक्याची थंडी असली तरी लोक मदतीसाठी पुढे येत आहेत.