एपी, अंकारा : तुर्कस्तानच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आता दुसऱ्या फेरीत होईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. विद्यमान अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगोन यांना पहिल्या फेरीत ४९.५ टक्के मते मिळाली, तर कलचदारलू यांना ४५.५ टक्के मते मिळाली आणि तिसरे उमेदवार सिनान ओगान यांना ५.२ टक्के मते मिळाली.
एर्दोगोन यांनी आपल्या प्रमुख प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली, मात्र त्यांना बहुमताचा आकडा गाठण्याइतकी निर्णायक मते पहिल्या फेरीत मिळाली नाहीत. त्यामुळे दुसऱ्या फेरीची वेळ आली. आता दुसऱ्या फेरीसाठी २८ मे रोजी मतदान होणार आहे. या फेरीत एर्दोगोन विजयी झाले तर त्यांची टर्कीवरील सत्ता अधिक बळकट होईल. ते गेल्या दोन दशकांपासून सत्ता गाजवत आहेत. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी केमाल कलचदारलू यांनी टर्कीमध्ये अधिक लोकशाही आणण्याचे आश्वासन दिले आहे.
निवडणुकीच्या वेळी प्रसिद्ध झालेल्या मतदान चाचण्यांमध्ये एर्दोगोन यांची २० वर्षांची सत्ता संपुष्टात येईल आणि नागरिक अधिक लोकशाहीवादी, उदारमतवादी नेत्याची निवड करतील असे कल दिसत होते, पण पहिल्या फेरीमध्ये तरी ते फोल ठरले आहेत. टर्कीमध्ये वाढलेली महागाई आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या भूकंपानंतरची परिस्थिती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश यामुळे मतदार एर्दोगोन यांच्याविरोधात असल्याचे मानले जात होते. मात्र एर्दोगोन यांना मिळालेली मते ही अपेक्षेपेक्षा चांगली आहेत, तसेच त्यांच्या सहकारी पक्षानेही कायदेमंडळावरील आपली पकड कायम ठेवली आहे. त्यामुळे एर्दोगोन यांना सत्ता राखण्याची चांगली संधी आहे. काहीशा अनपेक्षितपणे उद्भवलेल्या या अस्थैर्यामुळे टर्कीचा शेअर बाजार घसरला, त्यामुळे काही काळ ट्रेडिंग थांबवावे लागले. नंतर बाजाराची परिस्थिती काहीशी सावरली.
निवडणूक का महत्त्वाची?
टर्कीचे भौगोलिक स्थान आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी महत्त्वाचे असल्यामुळे पाश्चिमात्य देश आणि गुंतवणूकदार निवडणुकीच्या निकालावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सीरियातील युद्ध परिस्थिती, युरोपमध्ये येणारा स्थलांतरांचा लोंढा, युक्रेनच्या धान्याची निर्यात आणि नाटोचा विस्तार या सर्व बाबींमध्ये टर्कीची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच ही निवडणूकही महत्त्वाची आहे.