वृत्तसंस्था, अंकारा : तुर्कस्तानमध्ये अध्यक्षपदासाठी झालेल्या फेरनिवडणुकीत विद्यमान अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी आघाडी घेतली आहे. सरकारी आणि विरोधकांची विचारसरणी मानणाऱ्या वृत्तसंस्थांच्या आकडय़ांमध्ये तफावत असली, तरी सध्या एर्दोगन हेच त्यांचे प्रतिस्पर्धी केमाल क्लुचदारोलो यांच्यापेक्षा पुढे आहेत. १४ मे रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्षपदाच्या एकाही उमेदवाराला निवडून येण्यासाठी आवश्यक ५० टक्के मते मिळाली नव्हती. त्यामुळे रविवार, २८ मे रोजी फेरमतदान घेण्यात आले. यावेळी एर्दोगन आणि क्लुचदारोलो हे दोनच उमेदवार रिंगणात होते.
शेवटचे वृत्त हाती आले, तोपर्यंत ८८ टक्के मतपेटय़ांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली होती. त्यानुसार सरकारी वृत्तसंस्था अनादोलूने एर्दोगन यांना ५३ टक्के तर क्लुचदारोलो यांना ४७ टक्के मते पडल्याचे अनुमान वर्तविले आहे. तर विरोधकांशी जवळीक असलेल्या अन्का न्यूज एजन्सीने एर्दोगन यांना ५१ टक्के आणि क्लुचदारोलो यांना ४९ टक्के मते दर्शविली आहेत. त्यामुळे १० वर्षे पंतप्रधान आणि नंतरची १० वर्षे राष्ट्राध्यक्ष असलेले एर्दोगन पुन्हा एकदा सत्ता कायम राखण्याची शक्यता निर्माण झाली आहे.