तुर्कस्थान हुकूमशाहीविरोधात गेल्या शुक्रवारपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा भडका सोमवारीही कायम होता. तुर्कस्थानाच्या विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनात पोलिसांकडून अमानुष लाठीमार होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र हे आंदोलन यशस्वी होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. दुसरीकडे, तुर्कीचे अध्यक्ष रिजेप तय्यिप एर्दोगन यांनी मात्र या आंदोलनावर आगपाखड केली आहे. आमचे सरकार लोकशाही मार्गानेच निवडून आले आहे, हे या आंदोलकांनी ध्यानात ठेवावे. या आंदोलनामागे आमच्या विरोधी पक्षांचा तसेच परकीय शत्रूंचा हात आहे का, याचा शोध आमच्या तपास यंत्रणा करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
इस्तंबूल शहरातील एका बागेतील झाडे मोठय़ा प्रमाणात तोडल्याने या आंदोलनाची ठिणगी पडली. मात्र, हा प्रश्न चर्चेने सोडविण्याऐवजी एर्दोगन सरकारने पोलिसी बळ वापरल्याने हे आंदोलन पेटले. यात आतापर्यंत शेकडो जणांना तुरुंगात डांबण्यात आले आहे, तर पोलिसी कारवाईतही शेकडो जण जखमी झाले आहेत.
संपूर्ण तुर्कस्थानमध्ये हे आंदोलन सुरू असले तरी त्याचे प्रमुख केंद्र हे इस्तंबूलमधील तस्कीम चौक ठरले आहे. या चौकात हजारो आंदोलक ठाण मांडून बसले असून एर्दोगन यांच्या विरोधात घोषणा देत आहेत. हुकूमशहा चले जाव, तुम्ही पदच्युत होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशा घोषणा दिल्या जात आहेत. तुर्कस्थान आता निधर्मी असूनही या सरकारकडून पुन्हा इस्लामी कायदा लागू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही या आंदोलकांनी केला आहे.
एर्दोगन या प्रकारामुळे संतापले असून आपल्या कारकिर्दीत एवढे विध्वंसक आंदोलन पाहिले नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे.
या आंदोलनामागे आमचे विरोधक अथवा परकीय हात आहे का, याचा आम्ही तपास करत आहोत. कोणत्याही परिस्थितीत आमचे सरकार या आंदोलकांसमोर झुकणार नाही, असे त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत सांगितले.
या दरम्यान ते सोशल मीडियावरही घसरले. सध्याच्या आधुनिक प्रसारमाध्यमांना सोशल मीडिया असे म्हटले जाते, मात्र हे सोशल मीडिया समाजविघातक काम करत आहेत, सरकारविरोधात अतिशय खोटा प्रचार करण्याची मोहीम त्यांनी उघडली आहे, असे ते म्हणाले.
तुर्कस्थानमधील आंदोलन अद्याप पेटलेलेच
तुर्कस्थान हुकूमशाहीविरोधात गेल्या शुक्रवारपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा भडका सोमवारीही कायम होता. तुर्कस्थानाच्या विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनात पोलिसांकडून अमानुष लाठीमार होत असल्याच्या तक्रारी आहेत.
First published on: 04-06-2013 at 04:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkey protests still continued