तुर्कस्तानमध्ये गेली अनेक वर्षे वर्चस्व असलेल्या जस्टीस अँड डेव्हलपमेंट पार्टी (एकेपी) या पक्षाने निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करीत पुनरागमन केले.
संकटग्रस्त तुर्कस्तानसाठी या निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एकेपी या पक्षाची स्थापना रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी केली असून त्यांच्या पक्षाला ४९ टक्के मते व ५५० पैकी ३१५ जागा मिळाल्या आहेत, बहुतांश मते मोजून झाली आहेत व सरकार स्थापनेसाठी पुरेसे बहुमत एडरेगन यांना मिळाले आहे. आजचा दिवस विजयाचा आहे असे पंतप्रधान अहमते दावुतोग्लू यांनी त्यांच्या मूळ गावी समर्थकांपुढे बोलताना सांगितले. अनेक जनमत चाचण्यांचे अंदाज यात चुकले असून या चाचण्यात एकेपीला केवळ चाळीस टक्के मते मिळतील असे म्हटले होते व तेरा वर्षांत प्रथमच हा पक्ष बहुमत गमावेल असे म्हटले होते. एर्दोगन यांच्यासाठी हा मोठा व्यक्तीगत विजय असून आता ते अमेरिकेसारखी कार्यकारी अध्यक्षीय पद्धत राबवण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकतात. तुर्कस्तानात कुर्दीश िहसाचार व जिहादी हल्ल्यांमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. शिवाय लोकशाही व अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. या विजयानंतर दियारबकीर या कुर्दीश शहरात बंडखोरांनी टायर जाळले. त्यावेळी त्यांच्यावर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. आपणच तुम्हाला वाचवू शकतो असे एर्दोगन यांनी मतदारांना सांगितले त्यामुळे त्यांना सत्ता मिळाली असे मत वॉशिंग्टन इन्स्टिटय़ूट फॉर निअर ईस्ट पॉलिसी या संस्थेतील तुर्कस्तान अभ्यास केंद्राचे संचालक सोनेर कॅगापटाय यांनी म्हटले आहे. एर्दोगन यांनी मी व पंतप्रधान अहमेत डावूटोग्लू हेच तुमचे संरक्षण करू शकतील असे आश्वासन दिले होते. एकतर मला निवडून द्या नाहीतर कुर्दीश बंडखोरांच्या अराजकास तोंड देण्यास तयार रहा असे त्यांनी म्हटले होते.