दोन आठवड्यांपूर्वी टर्कीत भूकंपाची विनाशकारी घटना घडली होती. टर्की आणि सीरीया देशात झालेल्या या भूकंपात हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. या धक्क्यातून अद्याप देश सावरलाही नाही, तोपर्यंत टर्की आणि सीरीया देशाच्या सीमेवर आणखी एक भूकंप घडला आहे. हा भूकंप ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती समोर येत आहे. टर्कीच्या हाते (Hatay) प्रांतात ही भूकंपाची घटना घडली आहे.
यूरोपीय भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने (EMSC) दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १.२ मैल अर्थात जवळपास दोन किलोमीटर खोल आहे. सोमवारी टर्की आणि सीरीया देशाचा सीमाभाग ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेनं हादरला आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. दोन आठवड्यांपूर्वी याच प्रदेशात विनाशकारी आणि प्राणघातक भूकंपाची घटना घडली होती.
टर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत ४६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही देशामध्ये अद्याप बचावकार्य सुरु आहे. हे बचाव कार्य सुरू असताना याच भागात भूंकपाचे हादरले बसले आहेत. यामुळे स्थानिक लोक भयभीत झाले आहेत.