टर्की आणि सीरियामधील भूकंपांमुळे झालेल्या मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. या भूकंपाने आतापर्यंत २१ हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. बचावकार्य जसजसं पुढे सरकतंय तसतसं इमारतींच्या मलब्याखाली अडकलेल्या लोकांचे मृतदेह सापडत आहे. तर दुसऱ्या बाजूला टर्कीतल्या कडाक्याच्या थंडीमुळे बचावकार्यामध्ये अडथळे येत आहेत. रात्री तापमानाचा पारा शून्य अंशाच्या खाली जातोय. त्यामुळे बचावकार्य थांबवावं लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टर्की आणि सीरीयात आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे या दोन देशांच्या मदतीसाठी जगभरातले अनेक देश पुढे सरसावले आहेत. आतापर्यंत ७० हून अधिक देशांनी टर्कीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचबरोबर जागतिक बँकेने टर्कीला १.७८ बिलियन डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे. अनेक देशांनी टर्की आणि सीरियाला मदत सामग्री देखील पाठवली आहे. अमेरिकेने दोन्ही देशांना ८५ मिलियन डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर भारताने दोन्ही देशांमध्ये बचाव आणि वैद्यकीय पथक धाडलं आहे.

टर्कीमध्ये ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ४.१७ वाजता ७.८ मॅग्निट्युड इतक्या तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यानंतर टर्कीच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाचं केंद्र टर्कीतलं गाझियांटेप हे ठिकाण होतं. या भूकंपाची तीव्रता इतकी होती ज्यामुळे सीरियातही मोठं नुकसान झालं आहे. रेस्क्यू ऑपरेशन जसजसं पुढे सरकतंय तशी मृतांची संख्या वाढत आहे. आता मलब्याखाली असलेले मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. भूकंपाला आता ७६ तास उलटून गेले आहेत. त्यामुळे अजूनही मलब्याखाली अडकलेले लोक जीवंत असण्याची शक्यता कमीच आहे.

हे ही वाचा >> …अन् टर्कीश महिलेनं इंडियन आर्मीच्या महिला अधिकाऱ्याला मिठी मारून चुंबन घेतलं, मन जिंकणारा PHOTO व्हायरल!

टर्की-सीरियाच्या मदतीसाठी भारताचं ‘ऑपरेशन दोस्त’

टर्की-सीरियाच्या मदतीसाठी भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ ही मोहीम हाती घेतली आहे. भारताने आतापर्यंत मदतकार्यासाठी एनडीआरएफची ३ पथकं पाठवली आहेत. तसेच वैद्यकीय पथक देखील पाठवलं आहे. भारताने आतापर्यंत ४ विमानं पाठवली आहेत. ज्यापैकी दोन विमानांमध्ये एनडीआरएफची पथकं आणि दोन विमानांमध्ये सी-१७ ही वैद्यकीय पथकं पाठवली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkey syria earthquake death toll touches 21000 still many people trapped in debris asc