Turkey vs Israel Erdogan Threat to Jews Country : इस्रायल हमास संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच मध्य-पूर्वेतील मुस्लिम देश इस्रायलला घेरण्याच्या तयारीत आहेत. हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला करून दंड थोपटले आहेत. पाठोपाठ तुर्कीनेही इस्रायलविरोधात शड्डू ठोकला आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैय्यप एर्दोगन यांनी रविवारी (२८ जुलै) इस्रायलविरोधात सैन्य कारवाई करण्याची धमकी दिली आहे. इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये तणाव वाढलेला असतानाच एर्दोगन यांनी देखील यात उडी घेतली आहे. दरम्यान, एर्दोगन यांच्या धमकीचा इस्रायलवर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट इस्रायलने तुर्कीला गंभीर इशारा दिला आहे. इस्रायलने म्हटलं आहे की “त्यांची अवस्था सद्दाम हुसैनसारखी होईल.” सद्दाम हुसैन हे इराकचे माजी अध्यक्ष होते, ज्यांना खुलेआम फाशीची शिक्षा देण्यात आली होती.
इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल काट्ज यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे, या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, “इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी देऊन एर्दोगन हे सद्दाम हुसैनच्या पावलावर पाऊल टाकत आहेत असं दिसतंय. सद्दाम हुसैनचं पुढे काय झालं, तो कसा मारला गेला ते एर्दोगन यांनी लक्षात ठेवायला हवं”. काट्ज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एर्दोगन आणि सद्दाम हुसैन यांचे फोटो एकत्र करून शेअर केले आहेत. एर्दोगन म्हणाले होते की “तुर्कीचं सैन्य इस्रायलमध्ये घुसू शकतं, जसं यापूर्वी लीबिया आणि नागोर्नो काराबाखमध्ये घुसलं होतं.” दरम्यान, एर्दोगन यांनी तुर्की सैन्य इस्रायल-हमास युद्धात, गाझा पट्टीत कशा प्रकारचा हस्तक्षेप करेल हे सांगितेलं नाही.
एर्दोगन यांची इस्रायलवर टीका
एर्दोगन हे इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून सातत्याने इस्रायलविरोधात बोलत आहेत. इस्रायलच्या गाझातील हस्तक्षेपावर त्यांनी जागतिक पातळीवरून टीका केली आहे. तसेच एर्दोगन त्यांच्या पक्षाच्या एका कार्यक्रमात म्हणाले होते, आपल्याला (तुर्की) खूप मजबूत आणि सक्षम व्हावं लागेल, जेणेकरून इस्रायल पॅलेस्टाईनबरोबर जे काही करतोय ते करण्याची त्यांची हिंमत होणार नाही. आपण काराबाखमध्ये घुसलो, लीबियात घुसलो तसा कारनामा पुन्हा करू शकतो. यावर इस्रायलने अधिकृतपणे कोणतंही प्रत्युत्तर दिलं नव्हतं.
तुर्कीचा आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप
एर्दोगन तुर्कीने यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कारवायांचा पाढा वाचत असतानाच इस्रायलने त्यांना सद्दाम हुसैन यांच्याबरोबर झालेल्या गोष्टींची आठवण करून दिली आहे. २०२० मध्ये तुर्की सैन्याने संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या लीबियामधील सरकारचं समर्थन केलं होतं. तसेच अजरबैजान व अर्मेनियामधील नागोर्नो-काराबाख संघर्षातही तुर्कीने उडी घेतली होती.