Turkish Parliament Chaos : तुर्कस्तानच्या संसदेमध्ये सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. एका विषयावर चर्चा सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही सदस्यांमध्ये आधी आरोप-प्रत्यारोप आणि शाब्दिक वाद झाला. मात्र, त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये वाद वाढला आणि त्यांचं रुपांतर हाणामारीत झालं.
यामध्ये अनेक खासदारांचा सहभाग दिसला तर काही सदस्यांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला. या हाणामारीनंतर संसदेच्या मजल्यावर रक्त देखील दिसून आलं. दरम्यान, एका व्हिडीओमध्ये दिसून आलं की, सत्ताधारी एकेपी पक्षाचे खासदार व्यासपीठावर उभ्या असलेल्या अहमद सिकला टोला मारण्यासाठी धावले. पण लगेच दुसरे काही खासदारही या हाणामारीत सहभागी झाले.
संसदेत हाणामारी सुरु असताना काही खासदारांनी रोखण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या स्पीकरच्या व्यासपीठाच्यासमोरही काही ठिकाणी या हाणामारीनंतर रक्त पडलेलं दिसून आलं. संसदेत हा गदारोळ जवळपास अर्धा तास सुरु होता. या हाणामारीत दोन खासदार गंभीर जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. या हाणामारीच्या घटनेनंतर संसदेचे कामकाज थांबवण्यात आलं होतं. दरम्यान ही घटना शुक्रावारी घडली. याबाबतच एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
तुर्कस्तानच्या संसदेमध्ये सत्ताधारी एकेपी पक्षाचे सदस्य अल्पे ओझलान यांनी डाव्या वर्कर्स पार्टी ऑफ तुर्की (टीआयपी) चे खासदार अहमत सिक यांच्यावर हल्ला केला. यामुळे संसदेत गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारच्या वागणुकीचा निषेध केला. दरम्यान, तुर्कस्तानच्या संसदेत शुक्रवारी एक बैठक होत होती. यामध्ये खासदार काईन अटाले यांच्याविषयी चर्चा सुरु होती. खासदार काईन अटाले हे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत.
त्यांनी सरकारच्या विरोधात केलेल्या निदर्शनादरम्यान खूप हिंसाचार झाला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. मात्र, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत अटाले हे डाव्या टीआयपी पक्षातून निवडून आले होते. मात्र, सरकारने अटाले यांचे संसदेचे सदस्यत्व नाकारणारे विधेयक मांडले होते, त्यावरून सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षाचे सदस्य आमने-सामने आले आणि त्यांच्यामध्ये हाणामारी झाली.