कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणात तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरचे एक ना अनेक किस्से रोज समोर येत आहेत. काळ्या पैशाला पांढरे करण्याचा त्यांचा उद्योग आता जगासमोर आला आहे. अलीकडे वेबसीरीज पाहून गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले आहे. श्रद्धा वालकर प्रकरणात आफताब पुनावालाने देखील वेबसिरीज पाहून श्रद्धाची हत्या केली होती. त्याचप्रमाणे सुकेश आणि त्याची पत्नी लीना पॉलने देखील गुन्हा करण्याआधी नेटफ्लिक्सच्या ‘ओझार्क’ (Ozark) वेबसिरीजमधून प्रेरणा घेतली होती. सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज आणि नोरा फतेही यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसविल्याचा आरोप आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने सुकेश चंद्रशेखरच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब समोर आली. छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करुन काळ्या पैसा अधिकृत करण्याचे काम दोघे करत होते. नेटफ्लिक्सच्या ओझार्क या वेबसिरीजमध्ये मनी लॉड्रिंग गुन्ह्याची गोष्ट सांगितली आहे. ही वेब सीरीज पाहून सुकेश आणि लीना पॉलने बेकायदेशीररित्या जमवलेली माया कायदेशीर करण्याचा मार्ग शोधला.
हे ही वाचा >> “माझी गर्लफ्रेंड हो! तुला राजेशाही थाटात ठेवतो”, नोरा फतेहीनं सांगितली घोटाळेबाज सुकेशची ऑफर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी Nail Artistry या नावाने सलून उघडले होते. या सलूनच्या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे आल्याचे दाखविले गेले. तसेच सुपर कार आर्टिस्ट्री, LS फिशरीज, न्यूज एक्सप्रेस अशा अनेक छोट्या मोठ्या व्यवसायामधून काळ्या पैशाला कायदेशीर केले गेले. सुकेश आणि लीना दोघेही तुरुंगात आहेत.
एलएस (LS) चा अर्थ काय?
पोलिसांनी तयार केलेल्या चार्जशीटमध्ये नेल आर्टिस्ट्री, सुपर कार आर्टिस्ट्री, एलएस फिशरीज, एलएस एजुकेशन आणि न्यूज एक्सप्रेस पोस्ट या सर्व कंपन्यांच्या बँक खात्याचे स्टेटमेंटचा समावेश करण्यात आला आहे. यावरुन एलएस म्हणजे काय? असाही प्रश्न पडला होता. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर एल म्हणजे लीना आणि एस म्हणजे सुकेश असल्याचे समोर आले. जून २०२० ते ऑगस्ट २०२१ पर्यंत या कंपन्यांमध्ये अनेक लोकांकडून पैसे जमा झाले होते. हे व्यवहार फक्त धुळफेक करण्यासाठी केले गेले होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली.