नवी दिल्ली : मी बोलत असताना माइक बंद करणे हा माझा अपमान आणि अनादर असल्याचे खडेबोल बुधवारी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी वरिष्ठ सभागृहात सुनावले. खरगेंनी बोलू न दिल्याचा आरोप करत सलग दुसऱ्या दिवशी, विरोधकांनी राज्यसभेतून सभात्याग केला.
मणिपूरच्या मुद्दय़ावरून पाच दिवस वरिष्ठ सभागृहात सत्ताधारी ‘एनडीए’ व विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी सुरू आहे. मंगळवारी दुपारच्या सत्रात खरगे बोलत असताना माइक बंद केला गेल्याचे विरोधी सदस्यांचे म्हणणे होते. त्याविरोधात काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह विरोधकांच्या महाआघाडीतील घटक पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. माइक बंद केल्याच्या घटनेबद्दल खरगेंनी गुरुवारी सभागृहात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. संसदेच्या सभागृहात विरोधी पक्षनेते बोलण्यासाठी उभे राहतात तेव्हा, त्यांच्या पदाचा मान राखून त्यांना तातड़ीने बोलू दिले जाते. ही परंपरा लोकसभेत पाळली जाते. पण, राज्यसभेत मी विरोधी पक्षनेता असूनही हात वर करून वारंवार बोलू द्यावे यासाठी विनंती करावी लागते, असा संताप खरगेंनी व्यक्त केला.