मालक बाहेर गेले की घराची राखण करणाऱ्या पाळीव कुत्र्यांना घर खायला उठते. त्यामुळे त्यांना एकाकी वाटू लागते. त्यातून त्यांच्यात आक्रमकपणा वाढीस लागतो. हे सर्व टाळण्यासाठी आता खास पाळीव कुत्र्यांसाठी ‘डॉग टीव्ही’ ही नवीन वाहिनी इस्रायलमध्ये सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी अमेरिकेत हा अभिनव प्रयोग राबवण्यात आला होता.
पाळीव कुत्र्यांनाही भावभावना असतात. त्यांनाही एकाकीपण जाणवत असते. त्यामुळे मालक बाहेर गेले की पाळीव कुत्रे दिवसभर घरात एकटेच असतात, त्यांच्यातील एकलकोंडेपणा घालवण्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेल्या वर्षी ‘डॉग टीव्ही’ ही वाहिनी सुरू करण्यात आली. या वाहिनीवर सहा-सहा मिनिटांचे छोटेखानी कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात आले. या वाहिनीमुळे कुत्र्यांच्या वर्तनात बदल झाल्याचे निरीक्षण टिपण्यात आले. आता याचीच पुनरावृत्ती इस्रायलमध्ये केली जाणार आहे. या वाहिनीवरील कार्यक्रमांमुळे कुत्रे आनंदी तर राहतातच शिवाय त्यांच्यातील एकाकीपणाची भावनाही संपुष्टात येण्यास मदत होते तसेच ते अधिकाधिक जबाबदार बनतात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळेच इस्रायलमध्येही या वाहिनीची सुरुवात करण्याची मागणी जोर धरत होती. या पाश्र्वभूमीवर ही वाहिनी सुरू करण्यात आली आहे.

Story img Loader