चित्रपटाच्या निर्मितीपेक्षा मालिका निर्माण करताना अधिक दबावाचा सामना करावा लागतो. मालिका निर्मात्यांना मालिकेची निर्मिती करत असताना मार्केटिंग आणि टीआरपीचा दबावाचा सामना करावा लागतो, अशा प्रकारच्या दबावामुळेच आपल्याला मालिका निर्मिती करणे शक्य नाही, असे मत ज्येष्ठ कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी व्यक्त केले. गोव्यात सध्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू आहे. त्यानिमित्ताने दिलेल्या एका खास मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
आपण चित्रपटाप्रमाणेच दूरचित्रवाणी माध्यमाशीही चांगले परिचित आहोत. मात्र चित्रपट निर्मात्याला केवळ कलाप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे बंधन असते, तर मालिका निर्मात्यांना वाहिनी आर्णि मार्केटिंग विभागाचे दडपणही सहन करावे लागते. अशा प्रकारचे दडपण सहन करण्याची आपली कोणतीही इच्छा नाही, असे ११ पेक्षा अधिक कन्नड चित्रपटांची निर्मिती केलेल्या कासारवल्ली यांनी यावेळी स्पष्ट केले.
कर्नाटकातील चित्रपटगृहात दाखविल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या खेळांच्या संख्येचेही त्यांनी मुलाखतीदरम्यान समर्थन केले. काही वितरक एखाद्या बॉलिवूडपटाचे हक्क कोटय़वधी रुपयांना विकत घेत असतात, अशा परिस्थितीत तो चित्रपट ‘फ्लॉप’ झाल्यानंतर होणाऱ्या तोटय़ातून बाहेर पडल्याशिवाय त्याला कन्नड चित्रपटाची खरेदी करणे अशक्य असते असे कासारवल्ली यांनी सांगितले.
बॉलिवूडप्रमाणेच तामिळ आणि तेलगू चित्रपटांशीही स्पर्धा करावी लागत असल्याने कन्नड निर्मात्यांसमोर सध्या विविध आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा