चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक नऊवर उभ्या असलेल्या बंगळुरु-गुवाहाटी एक्स्प्रेसमध्ये कमी क्षमतेचे दोन स्फोट झाल्याची घटना आज (गुरूवार) सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी घडली. एक्स्प्रेसच्या S४ आणि S५ बोगीमध्ये हे स्फोट झाले. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी राजीव गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
मूळची गुंटूर येथील असलेल्या २२ वर्षीय स्वाती या तरूणीचा स्फोटात मृत्यू झाला असून, ती आपल्या कुटुंबासोबत बंगळुरू ते विजयवाडा असा प्रवास करत होती. स्वातीच्या सीटच्या खाली हा एका बॉम्बचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, चेन्नई स्थानकाजवळ एका बॅगमध्ये पाईप बॉम्ब बनवण्याचं साहित्य सापडल्याची माहिती समोर आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
एनआयएची टीम चेन्नईकडे रवाना झाली असून स्फोटांचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी ट्रेनमध्ये लपून बसलेल्या एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हा स्फोट आहे की घातपात याचा पोलिस तपास करत आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकाअर्जुन खर्गे यांनी मृत तरूणीच्या कुटुंबियांना एक लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमींना २५ हजार रूपये आणि किरकोळ जखमींना ५ हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
चेन्नई रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले असून, सुरक्षा चाचणीनंतर अकरावाजता सदर ट्रेन पुढील प्रवासासाठी निघणार असल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेसच्या प्रचारासाठी हिमाचाल प्रदेशच्या दौ-यावर आहेत. राज्य सरकारला आवश्यक ती मदत पुरण्याच्या सूचना आपल्या अधिका-यांना दिल्या असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.
मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक – ०४४२५३५७३९८

Story img Loader