दोन दिवसांपूर्वीच भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर विविध स्तरावरून या घटनचा निषेध करण्यात येत आहे. याप्रकरणी भारत सरकारने कारवाई केली असून खलिस्तानी समर्थकांचे ट्वीटर खाते भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. यामध्ये कॅनडातील एका राजकीय नेत्याचा समावेश आहे.
खलिस्तानी समर्थकांचे ट्वीटर खाते ब्लॉक
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने कॅनडातील कवयित्री रुपी कौर, युनायटेड शीख संघटनेचा कार्यकर्ता गुरदीप सिंग सहोता आणि कॅनडातील न्यू डेमोक्रॅटीक पक्षाचा नेता जगमीत सिंग यांची ट्वीटर खाते ब्लॉक करण्यात आले आहे. जगमीत सिंगने अनेकदा भारत विरोधी विधाने केल्याचंही सांगण्यात येत आहे.
भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर तिरंग्याचा अपमान
दोन दिवसांपूर्वी पंजाबमध्ये अमृतपाल सिंग विरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्ध खलिस्तानी समर्थकांकडून ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केला होता. तसेच अमृतपाल सिंगच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
भारत सरकारने मागितले होते स्पष्टीकरण
दरम्यान, या घटनेनंतर भारत सरकारने नाराजी व्यक्त केली होती. परराष्ट्र मंत्रायलयाने ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तांना बोलावून तीव्र निषेध व्यक्त केला होता. तसेच ही घटना घडली तेव्हा ब्रिटीश सुरक्षा अधिकारी या ठिकाणी उपस्थित का नव्हते? आंदोलनकर्त्यांना उच्चायुक्तालयाच्या परिसरात प्रवेश का देण्यात आला? यासंदर्भातील स्पष्टीकरणही भारत सरकारने मागितले होते.