भारतात लवकरच ‘ट्विटर ब्लू’ सेवा सुरू होणार आहे. या सेवेसाठी दर महिन्याला ७१९ रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे. अमेरिका, इंग्लंडसह काही देशांमध्ये ट्विटरने ही सेवा सुरू केली आहे. ‘ट्विटर ब्लू’ सेवेमध्ये ‘व्हेरिफाईड बॅज’ मोफत उपलब्ध केले जाणार आहे. अमेरिकेत या सेवेसाठी ७.९९ डॉलर्स म्हणजेच जवळपास ६४३ रुपये आकारले जात आहेत. भारतातील ट्विटर युजर्संना या सेवेच्या सबस्क्रिप्शनसाठी संदेश येत आहेत. या सेवेसाठी आयफोन युजर्संना प्राध्यान्य दिलं जाणार आहे.
‘ट्विटर ब्लू’ काय आहे?
या सेवेअंतर्गत ट्विटर युजर्संना कुठल्याही पडताळणी प्रक्रियेशिवाय ‘व्हेरिफाईड बॅज’ मिळणार आहे. या सेवेचे सबस्क्रिप्शन असणाऱ्या युजर्संना ट्विटरच्या इतर सेवांमध्ये प्राधान्य मिळणार आहे. या सेवेमुळे काही युजर्संमध्ये मतभेद आहेत. ट्विटर पैसे आकारून सर्वांना हा बॅज देत असल्यामुळे या सेवेचा गैरवापर होऊ शकतो, अशी शंका काही युजर्संना आहे.
‘रिप्लाय’, ‘मेन्शन’ आणि ‘सर्च’ या सेवांमध्ये ‘ट्विटर ब्लू’ युजर्संना प्राधान्य मिळणार आहे. यामुळे स्पॅम आणि स्कॅमपासून वाचण्यास मदत होईल. याशिवाय युजर्संना मोठे व्हिडीओ आणि ऑडिओदेखील पोस्ट करता येणार आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त जाहिरातींपासूनही या सेवेचे सबस्क्रिप्शन घेतल्यास युजर्सची सुटका होणार आहे.
ट्विटरचे मालकी हक्क मिळताच ‘ट्विटर ब्लू’ सेवेसाठी पैसे आकारण्याची घोषणा एलॉन मस्क यांनी केली होती. ट्विटरच्या युजर्संना अकाऊंट व्हेरिफाईड करुन ‘ब्लू टिक’ मिळवण्यासाठी आठ डॉलर म्हणजेच अंदाजे ६६१ रुपये प्रती महिना मोजावे लागणार असल्याची घोषणा मस्क यांनी केली होती. प्रत्येक देशाच्या खरेदी क्षमतेनुसार या फीमध्ये बदल होईल, असंही त्यांनी जाहीर केलं होतं.