एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटरमध्ये बरेच बदल केले जात असल्याचं दिसत आहे. नुकतच एलॉन मस्कनं ट्विटरचा लोगोच बदलल्यानंतर त्याची जगभरात चर्चा झाली होती. आता गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एका निर्णयाची अंमलबजावणी करायला ट्विटरनं सुरुवात केली आहे. या निर्णयाचा फटका जगभरातील अनेक दिग्गज मान्यवर, नेतेमंडळी, अभिनेते, खेळाडूंना बसला आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीही पैसे मोजण्याचा निर्णय एलॉन मस्कनं जाहीर केला. त्यापाठोपाठ ज्यांना याआधी फुकटात ब्लू टिक मिळाली आहे, त्यांचीही ब्लू टिक काढण्याचा निर्णय घेतला. आता त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे!
घोषणा आणि कारवाई!
एलॉन मस्कनं २० एप्रिलपासून सर्व लेगसी अकाऊंटचे ब्लू टिक काढले जातील असं जाहीर केलं होतं. पैसे मोजून ब्लू टिक घेणाऱ्यांनाच आता या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीच या सर्व अकाऊंट्सवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आली. आता वेबसाईटवरून पेमेंट करणाऱ्यांसाठी ८ डॉलर प्रतिमहिना तर मोबाईल अॅपवरून पेमेंट करणाऱ्यांसाठी ११ डॉलर प्रतिमहिना असे दर आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्याच अकाउंटची ब्लू टिक गायब!
ट्विटरनं कारवाई केलेल्या अकाऊंट्समध्ये खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचा समावेश आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही खात्याची ब्लू टिक हटवण्यात आली आहे.
राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांना या कारवाईचा फटका बसला असताना दुसरीकडे कलाजगत आणि क्रीडा जगतातील सेलिब्रिटी मंडळींच्याही अकाऊंट्सच्या ब्लू टिक काढण्यात आल्या आहेत. यात भारताचे आजी-माजी कर्णधार अर्थात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. शिवाय, किंग खान शाहरूख, अमिताभ बच्चन, आलिया भट यांच्या अकाऊंट्सच्या ब्लू टिक काढण्यात आल्या आहेत.
२००९ मध्ये झाली होती सुरुवात!
ट्विटरनं २००९ मध्ये ब्लू टिक द्यायला सुरुवात केली होती. सेलिब्रिटी मंडळी, राजकारणी, मोठमोठ्या कंपन्या, वृत्तसंस्था आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींचे अकाऊंट्स व्हेरिफाईड असून बनावट नाहीत हे ओळखू येण्यासाठी ब्लू टिकची सुविधा ट्विटरकडून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर इतर सामान्य वापरकर्त्यांनाही या सुविधेचा लाभ मिळू लागला. त्यासाठी ट्विटरकडून कोणतीही रक्कम आकारली जात नव्हती. आता मात्र ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागणार आहेत.