ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) डिक कॅस्टोलो यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटर नव्या सीईओच्या शोधात आहे. समाजमाध्यमांमध्ये अत्यंत लोकप्रीय असलेल्या ट्विटरच्या सीईओपदासाठी अनेक जण शर्यतीत आहेत. यात एका भारतीय महिलेचा देखील समावेश आहे. ट्विटरच्या सीईओपदी आंध्र प्रदेशातील पद्मश्री वॉरियर यांची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पद्मश्री वॉरियर या मूळच्या आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहेत. दिल्लीतील आयआयटीमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. न्यूयॉर्कच्या पॉलिटेक्निक विद्यापीठाने त्यांनी डी.लिट. देखील प्रदान केली आहे. त्या सध्या सीस्को सिस्टीमच्या सीईओ म्हणून कार्यरत आहेत.
पद्मश्री वॉरियर यांच्यासह सीबीएस इंटरअॅक्टिव्हचे जीम लॅन्झोन यांचाही ट्विटरच्या सीईओ पदासाठी विचार केला जात आहे. तर जॅक डोर्सी हे सध्या ट्विटरच्या सीईओपदाचा अतिरिक्त कारभार सांभाळत आहेत.