मोठ्या घरचा पोकळ वसा, अशी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे. काहीशी अशीच अवस्था सध्या टेस्ला आणि ट्विटरचा प्रमुख एलन मस्कची झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एलन मस्कने ट्विटरवर आपली मालकी प्रस्थापित केली. त्यानंतर एलनच्या लोकप्रियतेला जणू उतरती कळा लागली आहे. ट्विटरचे कर्मचारी कपात करण्यापासून ते ब्लू टीकचे पैसे मिळवण्यापर्यंत अनेक निर्णय वादात राहिले. आता तर ट्विटर कार्यालयाचा खर्च कमी करण्यासाठी एलन मस्कने कहरच केला. सॅन फ्रॅन्सिस्को येथील ट्विटर मुख्यालयातील टॉयलेट पेपर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ट्विटर मुख्यालयातील सुरक्षा रक्षक, शिपाई यांनाही कामावरुन हटविले आहे.
घरुनच टॉयलेट पेपर घेऊन या
एलन मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर कर्मचारी कपात तर केलीच, त्याशिवाय ट्विटर कर्मचाऱ्यांच्या अनेक सुविधा बंद केल्या आहेत. कार्यालयाचे भाडे, किचन सुविधा, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा, सुरक्षा कर्मचारी, शिपाई यांना कमी करुन खर्चात कपात केली आहे. त्यामुळे सॅन फ्रॅन्सिस्को येथील मुख्यालयात अस्वच्छता पसरली आहे. कार्यालयातील टॉयलेटमध्ये टॉयलेट पेपर, हँडवॉश देखील नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता घरुनच टॉयलेट पेपर आणण्यास सांगितले आहे.
न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटर कार्यालयातील सुरक्षा रक्षक, स्वच्छता कामगारांनी पगारवाढीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. तसेच ट्विटर कार्यालयातील चार मजले बंद करुन सर्व कर्मचाऱ्यांना दोन मजल्याच्या कार्यालयात काम करण्यास सांगितले गेले. तसेच सिएटलमधील कार्यालयाचे भाडे थकल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्यास सांगितले जात आहे.
एलन मस्कने ऑक्टोबर महिन्यात ४४ बिलियन डॉलर खर्च करुन ट्विटर कंपनी ताब्यात घेतली होती. कंपनी ताब्यात घेताच त्याने आधी कर्मचारी कपात केली. ट्विटरवर अन्याय करत असताना मस्क इतर कंपन्यात मात्र मोठी गुंतवणूक करत आहे. तसेच टेस्ला, स्पेस एक्स कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या इंजिनिअर्सना ट्विटरमध्ये काम करण्यासाठी आमंत्रण दिले जात आहे.