समाजमाध्यमांतील आघाडीची कंपनी ‘ट्विटर’चे नवे मालक इलॉन मस्क यांनी कंपनी दिवाळखोरीत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अनेक वरिष्ठ कर्मचारी कंपनी सोडून जात असल्याने इलॉन मस्क यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. इलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना कॉलदरम्यान संवाद साधताना दिवाळखोरीची शक्यता आपण नाकारु शकत नसल्याचं म्हटलं आहे. ब्लूमबर्गने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
ट्विटरचे दोन वरिष्ठ कर्मचारी Yoel Roth आणि Robin Wheeler यांनी राजीनामा दिला आहे. जाहिरातीसंबंधी चिंता निर्माण झाल्याने बुधवारी त्यांनी मस्क यांच्याशी ट्विटर स्पेसेस चॅटसंदर्भात चर्चा केली होती. त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीने रॉयटर्सशी बोलताना राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान रोथ आणि व्हिलर यांनी यासंदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
याआधी ट्विटरचे मुख्य सुरक्षा अधिकारी Lea Kissner यांनी ट्विट करत आपण राजीनामा दिल्याचं सांगितलं होतं. मुख्य गोपनीयता अधिकारी डॅमियन आणि मुख्य अनुपालन अधिकारी मारियान यांनीही राजीनामा दिला आहे.
जगभरातील कार्यालयांत ५० टक्के नोकरकपात
इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’चा ताबा घेतल्यानंतर आठवडय़ाभरातच अपेक्षेप्रमाणे नोकरकपात सुरू झाली. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांना नोकरीवरून कमी करण्याबाबतचा ईमेल पाठवण्यात आला. अनेक भारतीयांच्या नोकरीवरही गदा आली आहे. भारतामध्ये सुमारे २३० ते २५० च्या दरम्यान कर्मचारी होते, ‘मिंट’ने दिलेल्या माहितीनुसार, आता भारतामधील ट्विटरच्या कार्यालयात १० कर्मचारीही शिल्लक नाहीत.
भारतात लवकरच ‘ट्विटर ब्लू’ सेवा
भारतात लवकरच ‘ट्विटर ब्लू’ सेवा सुरू होणार आहे. या सेवेसाठी दर महिन्याला ७१९ रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे. अमेरिका, इंग्लंडसह काही देशांमध्ये ट्विटरने ही सेवा सुरू केली आहे. ‘ट्विटर ब्लू’ सेवेमध्ये ‘व्हेरिफाईड बॅज’ मोफत उपलब्ध केले जाणार आहे. अमेरिकेत या सेवेसाठी ७.९९ डॉलर्स म्हणजेच जवळपास ६४३ रुपये आकारले जात आहेत. भारतातील ट्विटर युजर्संना या सेवेच्या सबस्क्रिप्शनसाठी संदेश येत आहेत. या सेवेसाठी आयफोन युजर्संना प्राध्यान्य दिलं जाणार आहे.