ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचे मालक तथा अब्जाधीश एलॉन मस्क आणि अॅपल या कंपनीमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. अॅपल कंपनीने आपल्या अॅप स्टोअरमधून ट्विटर अॅप हटवण्याची धमकी दिली आहे, असा दावा एलॉन मस्क यांनी केला आहे. तसेच अॅपलने ट्विटरवर जाहिरात देणे बंद केले आहे. अॅपल कंपनीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तिरस्कार आहे का? असा सवालही एलॉन मस्क यांनी केला आहे. मस्क यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली असून अॅपल कंपनीने यावर अद्याप आपले स्पष्टीकरण दिलेले नाही.
हेही वाचा >>>भारतात प्रिमियम स्मार्टफोन विक्रीमध्ये अॅपल आघाडीवर, ‘हा’ आयफोन ठरला बेस्ट सेलर
एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटर खात्यावर काही सलग ट्वीट केले आहेत. ‘अॅपल कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. अॅपल कंपनीने ट्विटवरवर जाहिराती देणे जवळजवळ बंदच केले आहे. अॅपल कंपनीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भीती वाटते का? अॅपलने आणखी कोणाकोणावर अशी सेन्सॉरशीप लादलेली आहे. अॅपलने त्यांच्या अॅप स्टोअरवरून ट्विटर हे अॅप हटवण्याचीही धमकी दिलेली आहे. मात्र ही धमकी नेमकी का दिली, याबाबत त्यांनी काहीही सांगितलेले नाही,’ असे एलॉन मस्क आपल्या ट्वीट्समध्ये म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> आयफोन १५ अल्ट्रा येताच अलिकडेच लाँच झालेला ‘हा’ मॉडेल होणार बंद? लिकमधून जाणून घ्या किंमत आणि बरेच काही
अॅपलच्या अॅप स्टोअरवरून ग्राहकांनी काही अॅप्स खरेदी केल्यास ३० टक्के छुपा कर आकारला जातो, याबाबत तुम्हाला माहिती आहे का, असा सवालही एलॉन मस्क यांनी केला आहे. ग्राहकांना प्रभावित करणाऱ्या सर्व सेन्सॉरशीप अॅपलने सार्वजनिक करायला हव्यात का? असे विचारत एलॉन मस्क ट्विटरवर एक पोल घेत आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेमध्येच व्यक्तिस्वातंत्र्य नसेल तर आगामी काळातील जुलूमशाहीचे ते द्योतक आहे, असा इशाराही मस्क यांनी दिला आहे.
दरम्यान, मस्क यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर अॅपल कंपनीने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र मस्क यांच्या आरोपांमुळे ट्विटर आणि अॅपल यांच्यात वाद वाढण्याची चिन्हे आहेत.