Twitter Layoff: ट्विटरवर ताबा मिळताच एलॉन मस्क यांनी जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यानंतर आता या कंपनीत पुन्हा नोकरकपात झाल्याची माहिती समोर येत आहे. नोकरकपातीच्या दुसऱ्या फेरीत ट्विटरमधून साडेपाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचे वृत्त ‘सीएनबीसी’ने दिले आहे. कर्मचाऱ्यांना पूर्वसुचनेची नोटीस न देता नोकरकपात करण्यात आली आहे. याबाबत ट्विटरकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचा मोठा इशारा, म्हणाले “कंपनी दिवाळखोरीत…”
कंपनीचे ईमेल आणि इतर सुविधा बंद झाल्यानंतर नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं आहे. रिअल इस्टेट, मार्केटिंग, अभियांत्रिकी आणि इतर विभागांमध्ये काम करणाऱ्या अमेरिकेसह इतर देशांमधील कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावल्याचे वृत्त ‘सीएनबीसी’ने दिले आहे. या कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापकांनादेखील नोकरकपातीविषयी माहिती नसल्याचे पुढे आले आहे.
कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी नोकरीवरुन काढून टाकण्यात येत असल्याचा ईमेल ट्विटरकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. १४ नोव्हेंबर हा नोकरीचा शेवटचा दिवस असल्याचंही यात नमुद करण्यात आलं आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच सर्वात आधी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली. त्यानंतर सीएफओ नेड सेगल, पॉलिसी चीफ विजया गड्डे यांनाही डच्चू दिला. दरम्यान, अनेक भारतीयांच्या नोकरीवरही गदा आली आहे. ट्विटरने भारतातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे.