बनावट खात्यांकडून गैरवापर झाल्यानंतर ट्विटरनं गेल्याच आठवड्यात लॉन्च केलेली आठ डॉलर्स सबस्क्रिप्शनची ‘ब्लू टिक’ सेवा शुक्रवारी स्थगित केली आहे. ही सेवा पुन्हा कधी सुरू होणार याबाबत प्रश्न विचारले जात असतानाच ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘ट्विटर ब्लू’ सेवा पुढील आठवड्याच्या अखेरपर्यंत कदाचित पुन्हा सुरु होईल, अशी माहिती मस्क यांनी दिली आहे.
ट्विटरकडून ‘ब्लू टिक’ पूर्वी राजकारणी, पत्रकार, प्रसिद्ध व्यक्तींच्या व्हेरिफाईड खात्यांना दिली जात होती. मात्र, आता यासाठी सबस्क्रिप्शन सेवा सुरू केल्यानंतर ही टिक कोणालाही वापरता येणं सहज शक्य आहे. त्यामुळे गैरप्रकार वाढल्यानं ही सेवा स्थगित करण्याची नामुष्की ट्विटरवर ओढवली.
दरम्यान, या प्रकारानंतर कंपनीने हाय प्रोफाईल खात्यांसाठी नव्याने अधिकृत बॅजेस तयार केले आहेत. कंपनीच्या अंतर्गत मंजूर यादीनुसार व्यवसाय आणि माध्यमांशी संबंधित खात्यांवर ‘ग्रे बॅज’ दिसून येत आहे. ‘ट्विटर ब्लू’ सेवा स्थगित करण्याआधी कंपनीने महत्त्वाच्या खात्यांसाठी हा बॅज तयार केला आहे.
व्हेरिफाईड ‘ब्लू टिक’चा युजर्सकडून गैरवापर
व्हेरिफाईड ‘ब्लू टिक’साठी सबस्क्रिप्शन सुरू केल्यानंतर बनावट खात्यांमध्ये वाढ झाली होती. एका युजरने त्याच्या खात्यावर सुपर मारिओचा फोटो वापरून आक्षेपार्ह ट्वीट केले होते. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने फार्मा कंपनी ‘इली लीली’ या नावाचा वापर करत इंन्सुलीन मोफत देण्यात येणार असल्याचे म्हटलं होते. या ट्वीटमुळे कंपनीला ग्राहकांची माफी मागावी लागली. ट्विटरच्या एका युजरने ‘टेस्ला’ कंपनीच्या सुरक्षा रेकॉर्डचीदेखील खिल्ली उडवली होती.