अखेर ट्विट हा शब्द मानाच्या ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशात प्रवेश करता झाला आहे. सोशल नेटवर्किंगमुळे ट्विट हा शब्द आता आबालवृद्धांना परिचित आहे. कुठलाही शब्द जेव्हा ऑक्सफर्ड शब्दकोशात समाविष्ट केला जातो तेव्हा तो त्याआधी दहा वर्षे वापरात असावा लागतो, पण हा नियम ट्विट या शब्दाचा समावेश करताना बाजूला ठेवण्यात आला आहे.
ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशाचे मुख्य संपादक जॉन सिम्पसन यांनी सांगितले की, सोशल नेटवर्किंगच्या संदर्भात हा शब्द नाम व क्रियापद दोन्ही अर्थाने वापरला जातो तो आम्ही नुकताच शब्दकोशात समाविष्ट केला आहे.
कुठलाही शब्द ऑक्सफर्ड शब्दकोशात समाविष्ट करताना तो त्याआधी दहा वर्षे वापरात असावा लागतो पण आम्ही ट्विट या शब्दाला नियमाचा अपवाद करून शब्दकोशात स्थान दिले आहे. ट्विट हा शब्द अगोदर ऑक्सफर्ड शब्दकोशात आहे पण तो पक्ष्याचे गाणे या अर्थाने आहे. आता जून २०१३ च्या आवृत्तीत त्याचा नवा अर्थ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ऑक्सफर्ड शब्दकोशात रिट्विट हा शब्द मात्र २०११ मध्येच समाविष्ट करण्यात आला आहे.
डॅड डान्सिंग, एपिक, फिस्कल क्लिफ, फ्लॅश मॉब, फॉलो, गिकरी, पे डे लेंडिंग, द सायलेंट ट्रिटमेंट हे नवीन शब्दही ऑक्सफर्ड शब्दकोशात समाविष्ट करण्यात आले आहेत. ट्विटर ही एक माहिती यंत्रणा असून त्यामुळे लाखो लोक विविध घटनांचा वृत्तांत, कल्पना, मते व बातम्या यांच्याशी जोडले जातात. त्यात तुम्ही अकाउंट सुरू करून इतरांची संभाषणे फॉलो करणे म्हणजे अनुसरणे गरजेचे असते. ट्विटरमधील कुठलाही संदेश हा १४० अक्षरांचा असतो. तेवढय़ा मर्यादेत बसतील तेवढेच शब्द एका संदेशात घेतले जातात. दरदिवशी ३४ कोटी ट्विटस केले जातात.
बिग डाटा, क्राउड सोर्सिग, इ-रीडर, माउसओव्हर, रिडायरेक्ट (नाम), स्ट्रीम ( क्रियापद) हे नवीन तांत्रिक शब्दही ऑक्सफर्डच्या नव्या आवृत्तीत समाविष्ट केले आहेत.