जम्मू आणि काश्मीरच्या हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत ठार झालेला दहशतवादी मन्नान वाणी याच्या मृत्यूनंतर टीम इंडियाचा फलंदाज गौतम गंभीर आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यात शाब्दिक ट्विटरयुद्ध रंगले. गंभीरने ओमर अब्दुल्ला व जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना टॅग करुन एक ट्विट केले होते. त्यामध्ये, तुमच्यामुळेच एक युवक पुस्तकांपासून भरकटत गोळी चालवण्यास हतबल झाला. आपण एक दहशतवादी, एका कट्टर समर्थकास ठार केले, असे गंभीरने म्हटले होते.

गौतम गंभीरच्या ट्विटरला रिप्लाय करताना ओमर अब्दुल्ला यांनी गंभीरला लक्ष्य केले. या व्यक्तीला (गंभीरला) मन्नानच्या घरचा जिल्हाही माहित नसेल. पण, काश्मीरमधील एक तरुण कशाप्रकारे बंदुक हातात घेतो, याबाबत ते भाष्य करत आहेत. गंभीरला काश्मीरबाबतीत तेवढचं माहित आहे, जेवढं मला क्रिकेटबाबतीत समजतं. मात्र, मला क्रिकेट संदर्भात काहीच माहित नसल्याचा टोलाही ओमर अब्दुल्ला यांनी गंभीरला लगावला.

पण गौतमनेही या ट्विटची ‘गंभीर’ दखल घेत ‘तुम्ही तर नकाशाच्या बाता मारू नका, काश्मीरला पाकिस्तानच्या नकाशाशी जोडण्यासाठी तुम्हीच अधिक कष्ट घेतले आहेत. तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी काश्मीरमधील तरुणांसाठी काय केले हे तुम्हीच सांगा, असा प्रश्नही गंभीरने विचारला आहे. त्यावर पुन्हा अब्दुल्ला यांनी गंभीरला टार्गेट केले.

मी तुमच्यासोबत वाद घालू इच्छित नाही, ज्यांना राष्ट्रवाद आणि बलिदान माहित नाही, त्यांच्याशी मला चर्चा करायची नाही, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

Story img Loader