पीटीआय, वॉशिंग्टन
इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर ‘हमास’ने ओलीस ठेवलेल्या दोन अमेरिकन नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी हे जाहीर केले. आपले सरकार दोन्ही नागरिकांना अमेरिकेत सुरक्षित परतण्यासाठी आणि त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असेही बायडेन यांनी आवर्जून सांगितले.
ओलीस ठेवलेल्या अमेरिकन महिलेची आणि तिच्या किशोरवयीन मुलीची सुटका करण्यासाठी कतार आणि इस्रायलच्या सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल बायडेन यांनी आभार मानले. त्यानंतर लगेचच बायडेन यांनी मुक्त करण्यात आलेल्या या दोन नागरिकांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले, की ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ‘हमास’ने ओलीस ठेवलेल्या दोन अमेरिकन नागरिकांची आम्ही सुटका केली.
हेही वाचा >>>भारताने कॅनडाच्या ४१ अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले, अमेरिकेकडून काळजी व्यक्त, म्हणाले…
बायडेन यांनी सांगितले, की आमचे हे नागरिक गेल्या १४ दिवसांत एक भयंकर दिव्यातून गेले आहेत. त्यांनी खूप यातना सोसल्या आहेत. मला खूप आनंद वाटत आहे, की ते लवकरच आपल्या कुटुंबीयांमध्ये जातील. या घटनेने त्यांचे आप्तस्वकीय भयग्रस्त झालेले आहेत. या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्यासाठी अमेरिकन सरकारचे संपूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल.
‘सौदी-इस्रायल संभाव्य संबंध तोडण्यासाठीच हल्ला’
बायडेन यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात सांगितले, की सौदी अरेबियाशी संबंध प्रस्थापित करण्याचे इस्रायलचे प्रयत्न रोखण्यासाठी ‘हमास’ने हा हल्ला चढवला असल्याची खात्री आपल्याला वाटते. ‘हमास’ने इस्रायलवर हल्ला करण्याचे एक प्रमुख कारण हे असू शकते. मी या संदर्भात सौदी अरेबियासह बैठक घेणार असल्याची ‘हमास’ला कल्पना असावी. इस्रायलला मान्यता देण्याची सौदी अरेबियाची इच्छा होती, असे ते म्हणाले.