नवी दिल्ली : मणिपूरच्या मुद्दय़ावरून संसदेतील कोंडी मंगळवारीही कायम राहिली. विरोधकांच्या गदारोळात लोकसभेत सकाळच्या सत्रात कामकाज तहकूब झाले. तर, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलू दिले गेले नसल्याचा आरोप करत विरोधकांनी राज्यसभेत दुपारच्या सत्रात सभात्याग केला. या गोंधळातही लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात आली.
विरोधकांनी मणिपूरवर अल्पकालीन चर्चा करावी अन्यथा, सभागृहात नियमित कामकाज घेतले जाईल, असा थेट संदेश केंद्र सरकारने दोन्ही सदनांमध्ये दिला. लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजता सुरू झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी जैवविविधता दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडले. विरोधकांच्या घोषणाबाजीत चार सदस्यांनी विधेयकावर प्रत्येकी सुमारे पाच मिनिटांमध्ये मत मांडले. त्यानंतर केंद्रीयमंत्री यादव यांनी विधेयकावर संक्षिप्त प्रत्युत्तर देत विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. जैवविविधता विधेयकावर संसदेच्या संयुक्त समितीमध्ये सविस्तर चर्चा झाली असून सर्वमतांनी दिलेल्या अहवालानंतर हे विधेयक लोकसभेत मांडले गेले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्याला गेले होते. ते तेथून परतल्यानंतर सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील बहुराज्यीय सहकारी संस्था दुरुस्ती विधेयक मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता मांडले गेले. हे विधेयकही शहा यांच्या संक्षिप्त उत्तरानंतर संमत करण्यात आले. राज्यसभेतही आदिवासीसंदर्भातील विधेयकावर चर्चा करण्यात आली.
‘राज्यसभेत खरगेंची अडवणूक’
पहिल्या तहकुबीनंतर दुपारी १२ वाजता राज्यसभेमध्ये विरोधकांच्या घोषणाबाजीत प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. सुमारे २० मिनिटांनंतर सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना शांततेचा इशारा दिला. विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर टीका केली. ‘ईस्ट इंडिया कंपनीवर पक्षाच्या बैठकीत बोलण्यापेक्षा सभागृहात मणिपूरवर बोलावे’, असे खरगे म्हणाले. त्यावर सभागृहनेते पीयुष गोयल यांनी आक्षेप घेतला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजस्थान, छत्तीसगडसह मणिपूरवरही बोलायला तयार आहेत. विरोधक संवेदनशील असते तर चार दिवसांपूर्वीच चर्चा सुरू झाली असती, असे गोयल म्हणाले. खरगे अनेकदा बोलण्यासाठी उभे राहिले मात्र, त्यांना बोलता आले नाही, असे काँग्रेसच्या सदस्यांचे म्हणणे होते. खरगे यांचा माइक बंद केला गेल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केला. खरगेंची सभागृहात अडवणूक केल्याचा निषेध करत काँग्रेससह विरोधकांनी सभात्याग केला.