जम्मू काश्मीर पोलिसांनी भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांना आणि त्यांना दोन खासगी सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. कुपवारा येथे दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. आपल्याला पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात यावी या हेतूने या दोघांनी दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केल्याचं पोलिसांनी मंगळावारी अटकेची कारवाई केल्यानंतर स्पष्ट केलं.

इश्फाक अहमद मीर असं अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकाचं नाव असून तो कुपवारा येथील भाजपाच्या आयटी सेलचा प्रमुख आहे. पक्षाचे जिल्हा प्रवक्ते बशरत अहमद आणि आपल्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने इश्फाक यांनी दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केला. भाजपाने इश्फाकचे वडील मोहम्मद शाफी मीर यांची पदावरुन हकालपट्टी केल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत भाजपाचे कुपवारा जिल्हाध्यक्ष असणाऱ्या मोहम्मद शाफी मीर यांना पदावरुन हटवण्यात आल्याचं भाजपाने म्हटलं आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “या प्रकरणाची संपूर्ण माहिती आम्हाला एक दोन दिवसांमध्ये मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला. इश्फाकवर १६ जुलै रोजी हल्ला झाल्याचं सांगण्यात आलं होतं. गुलगाम गावामध्ये मदत साहित्याचं वाटप करताना हल्ला झाल्याचं सांगण्यात आलं. या हल्ल्यामध्ये माझ्या हाताला गोळी लागल्याने मी जखमी झाल्याचंही इश्फाकने म्हटलं होतं. मात्र त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि हा दहशतवादी हल्ला नसल्याचं स्पष्ट केलं. दहशतवाद्यांना प्रतिउत्तर देताना इश्फाकच्या सुरक्षा रक्षकाकडे असलेल्या बंदुकीमधून चूकून सुटलेल्या गोळीमुळे तो जखमी झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र पोलिसांनी चौकशी केली असता इश्फाक, बशरत आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी बनाव करत ही घटना घडल्याची खोटी कहाणी रचल्याचं समोर आलं.

पोलिसांकडून आपल्याला सुरक्षा मिळावी या हेतूने आपल्यावर हल्ला झाल्याचा बनाव या भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच पक्षाच्या नेत्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी त्यांनी खोटी माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. इश्फाकला झालेली जखम सुद्धा गोळीने झाल्याचं दाखवण्यासाठी विशेष प्रयत्न या दोघांनी केल्याचं सुत्रांनी सांगितलं. सोमवारी या प्रकरणामध्ये आरोपी असणाऱ्या दोन सुरक्षा रक्षांसहीत दोन्ही भाजपा पदाधिकारी न्यायालयासमोर हजर झाले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवलंय.

भाजपाने इश्फाकच्या वडिलांना पदावरुन हटवलं आहे. भाजपाचे प्रसारमाध्यम प्रमुख मनझूर अहमद भट यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. “तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांना निलंबीत केलं आहे. २५ जुलैपर्यंत तपास पूर्ण होईल. त्यांच्या मुलाने हल्ला झाल्याचा बनाव केल्याच्या शक्यतेवरुन पक्षाने ही कारवाई केलीय. पोलीस सध्या तपास करत आहेत,” असं भट म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी इश्फाक आणि बशरतने सुरक्षेसंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्याचंही म्हटलं आहे. “सामान्यपणे सुरक्षेसंदर्भातीलन नियमांनुसार आमच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पाच वाजल्यानंतर बाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्यात. ते लोक मदतकार्यातील सामान वाटप करण्यासाठी गेल्याचं सांगण्यात आलं. मात्र एवढ्या संध्याकाळी जाण्याची गरज नव्हती,” असं भट म्हणाले.

Story img Loader